मोठी बातमी! मुंबईत अभिनेत्रीच्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, रंगेहात अटक
मोठी बातमी! मुंबईत अभिनेत्रीच्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, रंगेहात अटक
मुंबईत 41 वर्षीय अभिनेत्री वेश्याव्यवसाय प्रकरणात रंगेहात पकडली. पोलिस कारवाईत बंगाली आणि टीव्ही अभिनेत्रींची सुटका.
सायली मेमाणे
पुणे ५ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. 41 वर्षीय एका अभिनेत्रीच्या वेश्या व्यवसायाचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला असून या घटनेने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. हिरोईन बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनेक तरुणींना या अभिनेत्रीने फसवून वेश्याव्यवसायात ढकलल्याचा गंभीर आरोप आहे. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने कारवाई करत तिला रंगेहात पकडले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास नावाने ओळखली जाते. ती गेल्या अनेक वर्षांपासून या बेकायदेशीर धंद्यात सक्रिय होती. तिने ऑडिशनच्या नावाखाली तरुणींना बोलावून त्यांच्या करिअरची स्वप्ने दाखवली आणि त्यानंतर त्यांना वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात ढकलले. या महिलांचा गट तयार करून ती बेकायदेशीर धंदा चालवत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सापळा रचण्यात आला. पोलिस पथकाने दोन अधिकाऱ्यांना बनावट ग्राहक बनवून आरोपीपर्यंत पोहोचवले. आरोपीने या ग्राहकांना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशीमीरा परिसरातील एका मॉलमध्ये बोलावले होते. ठरलेल्या जागी पोहोचताच आरोपीने ग्राहकांकडून पैसे घेतले आणि त्याच वेळी पोलिसांनी कारवाई करत तिला रंगेहात पकडले.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांचे सहाय्यक पोलिस आयुक्त मदन बल्लाल यांनी सांगितले की, या कारवाईदरम्यान बंगाली चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीची तसेच छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची सुटका करण्यात आली. या महिलांना या बेकायदेशीर धंद्यात जबरदस्तीने ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्यांना आश्रयगृहात हलवले असून त्यांची समुपदेशनाची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणात आरोपी अभिनेत्रीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 143(3) अंतर्गत तसेच अनैतिक व्यापार (निवारण) अधिनियम (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे आणखी किती जणी या जाळ्यात अडकल्या आहेत याचा तपास सुरू आहे.
या धक्कादायक प्रकारामुळे मनोरंजन क्षेत्रातील काळी बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे. करिअर आणि प्रसिद्धीच्या नावाखाली अनेक तरुणींना बेकायदेशीर मार्गावर ढकलले जात असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा संशयास्पद घटनांची माहिती त्वरित द्यावी, ज्यामुळे अशा गैरप्रकारांवर आळा घालता येईल.
या घटनेनंतर मुंबई आणि ठाणे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. समाजमाध्यमांवर याबाबत चर्चा रंगली असून अनेकांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे. अभिनेत्रीच्या अटकेनंतर पुढील चौकशीदरम्यान आणखी अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.