मुंबई महापालिका निवडणुका: ‘डॅडी’ अरुण गवळींच्या कन्या मैदानात, दगडी चाळ पुन्हा चर्चेत

0
मुंबई महापालिका निवडणुका: ‘डॅडी’ अरुण गवळींच्या कन्या मैदानात, दगडी चाळ पुन्हा चर्चेत

मुंबई महापालिका निवडणुका: ‘डॅडी’ अरुण गवळींच्या कन्या मैदानात, दगडी चाळ पुन्हा चर्चेत

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अरुण गवळी यांच्या कन्या गीता आणि योगिता गवळी निवडणुकीच्या तयारीत. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची नवी तारीख 31 जानेवारी 2026 निश्चित केली.

सायली मेमाणे

पुणे ३० सप्टेंबर २०२५ : मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असून राजकीय वातावरण तापले आहे. अखिल भारतीय सेनेचे संस्थापक अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’ सक्रिय राजकारणात उतरले नसले तरी त्यांच्या कन्या गीता आणि योगिता गवळी या निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. गीता गवळी यापूर्वी भायखळ्यात नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. आता त्या पुन्हा वार्ड क्र. 212 मधून उमेदवारी भरणार आहेत. तर अरुण गवळी यांची दुसरी कन्या योगिता गवळी वार्ड क्र. 207 मधून निवडणूक लढवणार आहेत.

दगडी चाळ परिसरातील गवळी कुटुंबाचा दबदबा राजकारणात कायम दिसून येतो. गीता गवळी यांनी सांगितले की, आतापर्यंत केलेल्या विकासकामांमुळेच जनता पुन्हा विश्वास दाखवेल. तर योगिता गवळी यांनीही आपली ओळख केवळ ‘डॅडी’ची मुलगी म्हणून नसून, स्थानिक कार्यकर्ती म्हणून लोकांमध्ये लोकप्रिय असल्याचा दावा केला आहे. एका एनजीओच्या माध्यमातून त्यांनी सतत भायखळ्यात लोकांशी संपर्क ठेवला असल्यामुळे त्याचा फायदा निवडणुकीत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय सेनेच्या नेत्या आणि अरुण गवळी यांच्या भावजई वंदना गवळी यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता योगिता गवळी उमेदवारी भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुरुंगातून बाहेर आलेले अरुण गवळी यांचे नाव आजही मतदारसंघात प्रभावी असल्याने, गवळी भगिनींना प्रचारासाठी जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत, असे चित्र दिसत आहे.

लोकांची कामे कधी संपत नाहीत आणि ती करण्याची संधी देवाने दिली आहे, असे गीता गवळी यांनी सांगितले. आमच्या कामांवर जनता खूश आहे आणि यावेळीही सत्ता आमच्याकडे परत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने केलेल्या अर्जावर सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना निवडणूक आयोगाला काहीसा दिलासा दिला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 ही नवी तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे राज्य सरकारला थोडा वेळ मिळाला असून, निवडणूक आयोगालाही निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी तयारी करण्याची संधी मिळाली आहे.

या निर्णयामुळे मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची हालचाल वेगाने सुरू झाली आहे. गवळी भगिनींच्या निवडणूक तयारीमुळे मुंबईच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. दगडी चाळीतील हालचालींमुळे अखिल भारतीय सेनेचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *