Mumbai One App: ‘मुंबई वन’ ॲपचं आज उद्घाटन; आता एका ॲपमधून मेट्रो, लोकल आणि बस प्रवास होणार सुलभ
'मुंबई वन' ॲपचं आज उद्घाटन; आता एका ॲपमधून मेट्रो, लोकल आणि बस प्रवास होणार सुलभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुंबई वन’ ॲपचं उद्घाटन करण्यात आलं आहे. हे भारतातील पहिले इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲप असून, मेट्रो, लोकल, मोनोरेल आणि बस प्रवासासाठी एकच डिजिटल तिकीट वापरता येणार आहे.
सायली मेमाणे
पुणे ८ ऑक्टोबर २०२५ : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) आणि मुंबई मेट्रो लाईन-3 च्या अंतिम टप्प्यासह ‘मुंबई वन’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी ॲपचे उद्घाटन करण्यात आले. हे ॲप मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवास पद्धतीत क्रांती घडवून आणणार असून, मुंबईकरांसाठी हे खऱ्या अर्थाने ‘वन नेशन, वन ट्रान्सपोर्ट ॲप’ ठरणार आहे.
‘मुंबई वन’ हे भारतातील पहिले इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲप आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे ॲप मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल 11 सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवठादारांना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणते. यात मुंबई मेट्रो (लाईन 1, 2A, 3 आणि 7), नवी मुंबई मेट्रो, मुंबई मोनोरेल, उपनगरीय रेल्वे, BEST, TMT, MBMT, KDMT आणि NMMT यांचा समावेश आहे.
या ॲपमुळे आता प्रवाशांना प्रत्येक वेळी वेगळे तिकीट घेण्याची गरज राहणार नाही. म्हणजेच, प्रवासी एका मेट्रो स्टेशनवरून उतरून लोकल किंवा मोनोरेलने प्रवास करत असला तरी एकच डिजिटल तिकीट पुरेसे ठरेल.
‘मुंबई वन’ ॲपमुळे प्रवाशांना मिळणारे फायदेही उल्लेखनीय आहेत. हे ॲप प्रवास अधिक सोपा, वेळ वाचवणारा आणि डिजिटल बनवेल. प्रवाशांना विविध वाहतूक पर्यायांसाठी एकच QR कोड आधारित डिजिटल तिकीट खरेदी करता येईल. तिकीट खिडकीवरील लांब रांगा आणि रोख व्यवहारांची झंझट पूर्णपणे संपणार आहे.
हे ॲप प्रवास नियोजनासाठीदेखील मदत करते. वापरकर्त्यांना त्यांच्या मार्गावरील पर्यायी रूट, वेळापत्रक, जवळपासची स्थानके आणि पर्यटनस्थळांची माहिती मिळू शकते. याशिवाय, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी SOS बटण देण्यात आले आहे, जे आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तात्काळ वापरता येईल.
ॲपचा वापरही अत्यंत सोपा आहे. Google Play Store किंवा Apple App Store वरून ‘Mumbai One’ डाउनलोड करून, मोबाईल नंबरद्वारे OTP पडताळणी करून लॉग-इन करता येते. वापरकर्ता आपले सुरुवातीचे आणि गंतव्य स्थानक निवडतो आणि UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरतो. पेमेंट झाल्यावर ताबडतोब एक QR कोड तयार होतो, जो मेट्रो स्थानकांवर स्कॅन करून प्रवास सुरू करता येतो.
मुंबई महानगर क्षेत्रातील वाढत्या वाहतूक दाबावर नियंत्रण ठेवत, ‘मुंबई वन’ ॲप हे टिकाऊ आणि स्मार्ट मोबिलिटीचे उदाहरण ठरू शकते. डिजिटल इंडिया उपक्रमाखाली तयार झालेलं हे ॲप मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाला केवळ सोयीस्कर नाही, तर अधिक स्मार्ट, जलद आणि सुरक्षित बनवणार आहे.