Nagpur News: मनपावर चौथ्यांदा भाजपचा भगवा; 120 चं लक्ष्य हुकलं, तरी 102 जागांवर दमदार विजय

0
Nagpur News: मनपावर चौथ्यांदा भाजपचा भगवा; 120 चं लक्ष्य हुकलं, तरी 102 जागांवर दमदार विजय

Nagpur News: मनपावर चौथ्यांदा भाजपचा भगवा; 120 चं लक्ष्य हुकलं, तरी 102 जागांवर दमदार विजय

नागपूर महानगरपालिकेत भाजपचा सलग चौथा विजय. 120 जागांचे लक्ष्य अपुरे ठरले तरी 102 जागांवर सत्ता कायम. एमआयएमची एंट्री, मुस्लिम लीगचे पुनरागमन आणि काँग्रेसची मर्यादित वाढ लक्षवेधी.

नागपूर महानगरपालिकेत अपेक्षेप्रमाणे भाजपने चौथ्यांदा सत्ता कायम राखत पुन्हा एकदा काँग्रेसचा पराभव केला आहे. 2007 पासून सलग विजयाचा इतिहास कायम ठेवणाऱ्या भाजपने यावेळी 120 जागांचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले होते. मात्र अंतिम निकालात भाजपला 102 जागांवर समाधान मानावे लागले. विक्रमी संख्येपासून अवघ्या सहा जागांनी दूर राहावे लागले असले, तरीही नागपूरच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व अबाधित राहिले आहे.

या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे एमआयएमची नागपूर मनपात झालेली दमदार एंट्री. एमआयएमने थेट 6 जागांवर विजय मिळवत शहराच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे. यासोबतच तब्बल 10 वर्षांनंतर इंडियन मुस्लिम लीगचे मनपात पुनरागमन झाले आहे. मुस्लिम लीगचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी नगरसेवक असलम खान मुल्ला यांनी चार सहकाऱ्यांसह पुन्हा एकदा मनपात प्रवेश केला.

काँग्रेसने मागील निवडणुकीच्या तुलनेत सहा जागांची वाढ करत 35 जागांपर्यंत मजल मारली आहे. मात्र शंभर जागांचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला अर्धशतकही गाठता आले नाही. प्रचारातील उदासीनता, अंतर्गत नाराजी आणि स्टार प्रचारकांचा अभाव याचा थेट फटका काँग्रेसला बसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

बसपासाठी ही निवडणूक निराशाजनक ठरली. एकेकाळी मनपात मजबूत असलेल्या बसपाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असून यावेळी पक्षाला केवळ एकाच जागेवर यश मिळाले. आसीनगर झोनमध्ये पारंपरिक बळ असतानाही बसपाचे कॅडर उमेदवारीवर नाराज असल्याचे चित्र दिसून आले. अतिआत्मविश्वास आणि संघटनात्मक कमजोरीमुळे बसपाचा गड ढासळल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

शिवसेना दुभंगल्यानंतरही ठाकरे गटाचे दोन नगरसेवक प्रभाग क्रमांक 28 मधून विजयी झाले आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आभा पांडे यांच्या रूपाने मनपात प्रतिनिधित्व मिळाले, तर शिंदे गटाने भाजपच्या कमळावर निवडणूक लढवत आपली उपस्थिती कायम ठेवली.

या विजयामागे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘मॅजिक’ कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दोघांच्या विकासाभिमुख प्रचाराला नागपूरकरांनी स्पष्ट कौल दिला. गडकरी यांनी नागपूरला ‘नंबर वन’ शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला होता, तर फडणवीस यांनी सुरू केलेल्या विकासकामांवर मतदारांनी शिक्कामोर्तब केले.

विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संयमाचा सल्ला देत, उत्सव साजरा करा पण उन्माद टाळा, असे स्पष्ट केले. जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरणे आणि नागपूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवणे हीच भाजपची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही विजयाचे श्रेय पक्ष कार्यकर्त्यांना देत, मागील 15 वर्षांतील विकासकामांवर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला असल्याचे सांगितले. नागपूरला औद्योगिक, आंतरराष्ट्रीय आणि मूलभूत विकासाचे आदर्श केंद्र बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *