नाशिक पोलिसांची मोठी कारवाई: पोलीस असल्याची बतावणी करून लूटमार करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
नाशिक
नाशिक : ‘आम्ही पोलीस आहोत’ असे भासवून सर्वसामान्यांना लुटणाऱ्या एका सराईत आंतरराज्य टोळीचा नाशिकच्या अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
३० किलोमीटर थरारक पाठलाग करून पोलिसांनी भिवंडीतील दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून ३० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
थरारक पाठलाग आणि अटक

२२ फेब्रुवारी २०२६ रोजी अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना, पाथर्डी फाटा परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या दोन संशयितांवर पोलीस अंमलदार मयूर पवार यांची नजर पडली. पोलिसांना पाहताच संशयितांनी मुंबई-आग्रा महामार्गाने पळ काढला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी तात्काळ अतिरिक्त कुमक पाठवून संशयितांचा पाठलाग सुरू केला. सुमारे ३० किमीचा पाठलाग केल्यानंतर ओझर येथील उड्डाणपुलावर पोलिसांनी या दोघांना शिताफीने घेरले. यावेळी आरोपींनी पोलिसांशी झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना यशस्वीरित्या ताब्यात घेतले.
५८ गुन्हे उघड, ३० लाखांचे सोने जप्त
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमजदअली अकबरअली बेग (४७ वर्ष) आणि फैयाज इम्तियाज अन्सारी (२८ वर्ष, दोघे रा. भिवंडी) अशी आहेत. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून २०१३ पासूनचे तब्बल ५८ गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये नाशिक शहर (४२), नाशिक ग्रामीण (१०), धुळे (५) आणि कर्नाटक राज्यातील (१) गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे २७१ ग्रॅम वजनाचे (अंदाजे किंमत ३० लाख रुपये) सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, हे आरोपी कर्नाटक राज्यातील पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या गुन्ह्यातही वॉन्टेड होते.
अशी होती गुन्ह्याची पद्धत

हे आरोपी स्वतः पोलीस असल्याचे सांगून नागरिकांना गाठायचे. पुढे ‘चेकिंग’ सुरू आहे किंवा ‘पुढे चोरी झाली आहे, तुमचे दागिने काढून रुमालात बांधून ठेवा’ अशी बतावणी करून ते हातचलाखीने दागिने लंपास करत असत. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, तांत्रिक तपास आणि आरोपींच्या देहबोलीचा अभ्यास करून मयूर पवार व पथकाने या गुन्हेगारांची ओळख पटवली.
पोलीस पथकाचे कौतुक
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, सपोनि विलास पडोळकर आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. या कामगिरीमुळे नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांना मोठा दणका दिला आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information