Palghar News: दांडी गावात अफवांमुळे तणाव, पोलिसांच्या सतर्कतेमुळे साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली

0
Palghar News: दांडी गावात अफवांमुळे तणाव, पोलिसांच्या सतर्कतेमुळे साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली

Palghar News: दांडी गावात अफवांमुळे तणाव, पोलिसांच्या सतर्कतेमुळे साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली

Palghar News: पालघरच्या दांडी गावात मुलींचे फोटो काढल्याच्या संशयातून जमाव आक्रमक झाला होता. मात्र पालघर पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे साधू हत्याकांडासारखी घटना टळली. वाचा सविस्तर.


पुणे १० जानेवारी २०२६ : पालघर जिल्ह्यातील दांडी गावात गडचिंचले येथील साधू हत्याकांडाची आठवण करून देणारी एक धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली होती. परराज्यातून रिक्षातून कपडे विक्रीसाठी आलेल्या चौघांवर ग्रामस्थांनी मुलं चोरणाऱ्या टोळीचा संशय घेतल्याने गावात तणावपूर्ण वातावरण तयार झाले. मात्र पालघर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत मोठा अनर्थ टाळला आणि संभाव्य हिंसाचार रोखण्यात यश मिळवले.

९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास दांडी बस स्टॉप परिसरात १३ वर्षीय दोन अल्पवयीन मुली बसची वाट पाहत होत्या. याचवेळी चादरी विक्रीसाठी आलेल्या चौघांनी कथितरित्या या मुलींचे मोबाईलवर फोटो काढले आणि कुठे जाणार आहेत याबाबत विचारपूस केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. या घटनेनंतर काही वेळातच गावात ‘मुले पळविणारी टोळी सक्रिय आहे’ अशा अफवा पसरल्या आणि संतप्त ग्रामस्थांनी संबंधित चौघांचा घेराव घातला.

गावकऱ्यांनी या चौघांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवल्याने परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. गडचिंचले साधू हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीती आणि संताप अधिक तीव्र झाला होता. मात्र घटनेची माहिती मिळताच सातपाटी पोलीस ठाणे आणि बोईसर विभागातील पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.

या प्रकरणात सुनिल संजय सलाट (वय २२), दोन अल्पवयीन मुले (वय १७ आणि १३) तसेच चंदा सुनिल सलाट (वय २५) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दांडी येथील तक्रारदाराच्या फिर्यादीवरून सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मपोउपनि सोनी जवादे करत आहेत. पोलिसांनी चौघांची चौकशी सुरू केली असून सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे.

पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सन २०२५ मध्ये लहान मुले-मुली पळवून नेल्याबाबत १९२ गुन्हे दाखल झाले होते. यापैकी १८२ मुले-मुली सुरक्षितरीत्या सापडली असून उर्वरित १० प्रकरणांचा तपास सुरू आहे. तपासात बहुतेक प्रकरणे अल्पवयीन प्रेमसंबंध, कौटुंबिक वाद किंवा रागातून घर सोडून जाण्याची असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही संघटित ‘मुले पळविणारी टोळी’ कार्यरत नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेनंतर पालघर पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास कायदा हातात न घेता थेट पोलीस नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन डायल ११२ किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दांडी गावातील या घटनेतून अफवांचे गंभीर परिणाम आणि पोलिसांच्या तत्परतेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed