Pandharpur Flood Alert : आषाढी एकादशीच्या तोंडावर चंद्रभागा नदीला पुराचा धोका, प्रशासन सतर्क

0
आषाढी एकादशीच्या तोंडावर चंद्रभागा नदीला पुराचा धोका

आषाढी एकादशीच्या तोंडावर चंद्रभागा नदीला पुराचा धोका

आषाढी एकादशीपूर्वी पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीची पातळी वाढली, उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; प्रशासन अलर्टवर.

सायली मेमाणे

पंढरपूर २४ जून २०२५ : पंढरपूर – अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात पुराचा धोका निर्माण झाला आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून, भीमा म्हणजेच चंद्रभागा नदीची पातळी चिंताजनकपणे वाढली आहे.

सध्या उजनी धरण 75% भरले असून 36,000 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. वीर धरणातूनही 15,000 क्युसेक विसर्ग सुरू असून ते पाणी नीरा–भीमा संगमातून चंद्रभागा नदीत मिसळत आहे. परिणामी, चंद्रभागेची पातळी 40,000 क्युसेक्सच्या पुढे गेली आहे आणि नदीकाठची मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

सध्या वारीसाठी लाखो भाविक पंढरपूरकडे निघाले असून, काही जण चंद्रभागेत स्नान करत आहेत. त्यामुळे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी भाविकांना वाहत्या पाण्यात स्नान करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नदीत पाय घसरून अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे भाविकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पूरनियंत्रणासाठी विशेष नियोजन केले असल्याचे सांगितले. उजनी धरणातून 28 जूनपर्यंत नियोजित पाण्याचा विसर्ग करून धरण साठा कमी केला जाणार आहे. यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत अधिक पाणी धरणात साठवता येईल आणि नदीपात्रात अनावश्यक विसर्ग टाळता येईल. वीर धरणासाठीही असेच नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, आषाढी वारीतील संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या असून, मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी वाढत आहे. यामुळे वारी सुरक्षित पार पडावी यासाठी प्रशासन विविध यंत्रणांच्या सहकार्याने अलर्ट मोडवर काम करत आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed