PMC Election Result: नवख्या उमेदवारांचा धक्का, पुण्यातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ

0
PMC Election Result: नवख्या उमेदवारांचा धक्का, पुण्यातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ

PMC Election Result: नवख्या उमेदवारांचा धक्का, पुण्यातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ

पुणे महापालिका निवडणूक निकालात भाजपला एकहाती सत्ता मिळाली, मात्र विरोधी पक्षांतील अनेक दिग्गज आणि ज्येष्ठ माजी नगरसेवकांना नवख्या उमेदवारांकडून पराभव पत्करावा लागला.

पुणे १८ जानेवारी २०२५: पुणे महापालिका निवडणूक निकालांनी यंदा राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. भाजपने एकहाती सत्ता मिळवत महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले असले, तरी या निवडणुकीतील सर्वात ठळक बाब ठरली ती म्हणजे विरोधी पक्षांतील अनेक दिग्गज आणि अनुभवी माजी नगरसेवकांचा झालेला दारुण पराभव. अनेक प्रभागांमध्ये नवख्या उमेदवारांनी थेट घरचा रस्ता दाखवत राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का दिला आहे.

या निवडणुकीत माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी उपमहापौर आबा बागुल, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष सुशील मेंगडे, माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पराभूतांच्या यादीत समावेश झाला आहे. शिवसेनेकडून सहावेळा नगरसेवक राहिलेले आबा बागुल यांना भाजपच्या महेश वाबळे यांनी पराभूत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा भाजपचे संदीप बेलदरे यांनी पराभव केला.

महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व शिवसेना ठाकरे गटाचे वसंत मोरे तसेच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रकाश कदम यांना भाजपच्या नवख्या व्यंकोजी खोपडे यांनी पराभूत केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांना सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला असून भाजपच्या वीणा गणेश घोष यांनी त्यांचा पराभव केला. स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांनाही भाजपच्या शैलजा भोसले यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

पुणेकरांचे विशेष लक्ष लागलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कुटुंबालाही या निवडणुकीत मोठा धक्का बसला. त्यांचा मुलगा प्रणव धंगेकर यांचा भाजपच्या गणेश बिडकर यांनी पराभव करत २०१७ च्या पराभवाची परतफेड केली. तसेच धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांनी पराभव केला. काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना अटीतटीच्या लढतीत अवघ्या ६२ मतांनी भाजपच्या विवेक यादव यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांना राष्ट्रवादीचे निवृत्त बांदल यांनी पराभूत केले. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचाही पराभव झाला. माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांना त्यांच्या पुतण्या भाजपचे उमेश गायकवाड यांनी पराभूत केले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनाही भाजपच्या निवेदिता एकबोटे यांच्याकडून थोडक्यात पराभव पत्करावा लागला.

भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणाऱ्या बंडू ढोरे यांचा भाजपच्या सनी निम्हण यांनी पराभव केला. राष्ट्रवादीकडून काँग्रेसमध्ये गेलेले प्रशांत जगताप विजयी ठरले, मात्र त्यांच्या मातोश्री ज्येष्ठ माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप यांचा भाजपच्या कालिंदी पुंडे यांनी पराभव केला. एकूणच या निवडणुकीत पुणेकरांनी अनुभवापेक्षा नव्या चेहऱ्यांना संधी देत राजकारणात बदलाची नांदी दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed