PMPML ज्युनिअर क्लार्क भरतीला स्थगिती मिळणार? आचारसंहिता भंग व भ्रष्टाचाराचे काँग्रेसचे गंभीर आरोप

0
PMPML ज्युनिअर क्लार्क भरतीला स्थगिती मिळणार? आचारसंहिता भंग व भ्रष्टाचाराचे काँग्रेसचे गंभीर आरोप

PMPML ज्युनिअर क्लार्क भरतीला स्थगिती मिळणार? आचारसंहिता भंग व भ्रष्टाचाराचे काँग्रेसचे गंभीर आरोप


Pune News: PMPML मध्ये आचारसंहितेच्या काळात कथित बेकायदा ज्युनिअर क्लार्क भरती व पदोन्नती. काँग्रेसने चौकशी व स्थगितीची मागणी; समिती स्थापन.


पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीएमएलमध्ये झालेल्या ज्युनिअर क्लार्क भरती आणि पदोन्नती प्रक्रियेवर मोठा वाद निर्माण झाला असून, या संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने या भरती प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेत आचारसंहिता भंग, नियमबाह्य नियुक्त्या आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचे आर्थिक अधिकार चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवावेत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसच्या आरोपानुसार, पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी लागू असलेल्या आचारसंहितेच्या काळात पीएमपीएमएलमध्ये कथितरीत्या ज्युनिअर क्लार्क पदावर भरती, पदोन्नती आणि वेतनवाढीचे आदेश काढण्यात आले. या प्रक्रियेत पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल करत संपूर्ण भरती प्रक्रिया स्थगित करण्याची आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

या प्रकरणावर संताप व्यक्त करत माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनीही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आचारसंहितेच्या काळात बेकायदा पदोन्नती, नियुक्त्या आणि वेतनवाढीचे आदेश काढण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे क्लीनर पदावर कार्यरत असलेल्या दोन व्यक्तींना थेट सॉफ्टवेअर इंजिनियर पदावर बढती देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व निर्णयांना तातडीने स्थगिती देऊन संबंधित कागदपत्रे मागवून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना लेखी पत्र सादर करून पीएमपीएमएलमधील कथित नियमबाह्य भरती प्रक्रियेबाबत सविस्तर आरोप मांडले आहेत. या पत्रात निवडणूक आचारसंहिता भंग, भरती प्रक्रियेत अनियमितता आणि काही पदांबाबत नियम डावलल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, सेवक भरती ही सन २०२३ च्या आशयपत्र आराखड्यातील अटी व नियम डावलून राबविण्यात आली आहे.

काँग्रेसने असा दावाही केला आहे की, शैक्षणिक पात्रता, सेवा ज्येष्ठता, अनुभव, वयोमर्यादा आणि निश्चित पात्रता नसतानाही काही उमेदवारांना पदोन्नती देण्यात आली. तसेच, १०० रिक्त जागांसाठी अंतर्गत जाहिरात देण्यात आली असताना प्रत्यक्षात आर्थिक गैरव्यवहार करून तब्बल २०० ज्युनिअर क्लार्कच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात उज्ज्वल केसकर यांनी सांगितले की, ३० जानेवारी २०२६ रोजी आचारसंहितेच्या काळात अनेक आदेश काढण्यात आले. त्यामध्ये १३ निलंबित कर्मचाऱ्यांना कोणतीही शिस्तभंग प्रक्रिया पूर्ण न करता पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले, तसेच २६ कर्मचाऱ्यांची स्टँड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा मूळ पगार ३५ हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत चौकशी समिती स्थापन केली आहे. या चौकशीनंतर पीएमपीएमएलच्या ज्युनिअर क्लार्क भरती प्रक्रियेवर स्थगिती येणार का, आणि दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed