Pune Airport : कुत्रा धावपट्टीवर आल्याने ‘एअर इंडिया’च्या फ्लाइटला हवेत घिरट्या; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
पुणे विमानतळावर एअर इंडिया विमानाला कुत्रा धावपट्टीवर आल्याने हवेत घिरट्या
पुणे विमानतळावर एअर इंडिया विमानाला कुत्रा धावपट्टीवर आल्याने हवेत घिरट्या; प्रवासात 57 मिनिटांचा उशीर, सुरक्षेवर प्रश्न.
सायली मेमाणे
पुणे 30 जून २०२५ : पुणे विमानतळावर शनिवारी एक गंभीर घटना घडली. भुवनेश्वरहून येणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ‘IX 1097’ या फ्लाइटला धावपट्टीवर कुत्रा आल्याने हवेतच घिरट्या माराव्या लागल्या. त्यामुळे विमानाला जवळपास 57 मिनिटे उशीर झाला. ही घटना अहमदाबाद येथील अलिकडील एअर इंडिया विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर विशेषतः चिंतेची ठरते.
शनिवारी दुपारी चारच्या सुमारास विमान भुवनेश्वर येथून पुण्याकडे रवाना झाले होते. परंतु, पुणे विमानतळाजवळ आल्यानंतर वैमानिकाला धावपट्टीवर कुत्रा असल्याची माहिती मिळाली. तत्काळ नियंत्रण कक्षाला सूचित करण्यात आले आणि विमानाला हवेतच वर्तुळाकार फिरत ठेवण्यात आले. कुत्र्याला हटवण्यासाठी ग्राउंड टीमला तातडीने पाचारण करण्यात आले. कुत्र्याला हटवून सुरक्षा सुनिश्चित झाल्यानंतरच विमानाला उतरवण्याची परवानगी देण्यात आली.
या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही प्रवाशांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत विमानतळ प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले. यापूर्वीही पुणे विमानतळावर अनेक वेळा धावपट्टीवर पक्ष्यांचा वावर आणि प्राण्यांची उपस्थिती ही समस्या ठरत आली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीहून येणाऱ्या विमानाच्या इंजिनावर पक्षी आदळल्याची नोंद आहे, तसेच एका प्रसंगी बिबट्याचाही धावपट्टी परिसरात वावर झाला होता.
हवाईतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “धावपट्टीवरील सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. अशा प्रकारे कुत्रा अथवा पक्षी धावपट्टीवर आल्यास मोठा अपघात होऊ शकतो. पुणे विमानतळाभोवती वाढणारी दाट वस्ती ही भविष्यात हवाई वाहतुकीस धोका ठरू शकते.”
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी, रविवारी पुण्याहून हैदराबादकडे जाणारे ‘इंडिगो’चे विमान हवाई वाहतूक कोंडीमुळे विजयवाडा येथे वळवावे लागले. हैदराबाद विमानतळाजवळ ट्रॅफिक जास्त असल्यामुळे हे निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त वेळ व त्रास सहन करावा लागला.
सततच्या घटनांमुळे पुणे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. धावपट्टीवर प्राणी किंवा पक्ष्यांचा वावर ही गोष्ट फक्त उशिराचा मुद्दा नसून, ती प्रवाशांच्या सुरक्षेशी थेट संबंधित आहे. त्यामुळे हवाई दल व नागरी उड्डाण प्राधिकरणाने पुणे विमानतळावर सुरक्षा सुधारण्यासाठी आणि वन्यजीव नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करणे गरजेचे आहे.