Pune Crime: पत्नीच्या नात्यांमुळे पतीने घेतला जीव; नाना पेठमधील घटना खळबळजनक
Pune Crime: पत्नीच्या नात्यांमुळे पतीने घेतला जीव
नाना पेठमध्ये पत्नीच्या मित्रासोबतच्या नात्यामुळे त्रस्त होऊन ३९ वर्षीय अतुल कदम यांनी आत्महत्या केली; पत्नी पोलिस कोठडीत.
सायली मेमाणे
पुणे ११ जुलै २०२५ : पुणे शहरातील नाना पेठ परिसरात पत्नी आणि तिच्या मित्राच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका ३९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास वेगाने सुरू आहे.
मृत तरुणाचे नाव अतुल मारुती कदम (वय ३९, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ) असे आहे. या प्रकरणी अतुल यांच्या आई माधुरी मारुती कदम (वय ६१) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, अतुलच्या पत्नी सोनाली अतुल कदम (वय ३१, रा. साडेसतरानळी, हडपसर) आणि तिचा मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल आणि सोनाली यांचा विवाह २०१५ मध्ये झाला होता. सुरुवातीपासूनच त्यांच्या वैवाहिक जीवनात वाद होते. तक्रारीनुसार, अतुल यांना पत्नी सोनालीचे कृष्णा शिंदेशी घनिष्ठ संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांमधील वाद अधिक तीव्र झाले. यामुळे सोनाली घर सोडून वेगळी राहू लागली.
सोनाली आणि तिचा मित्र कृष्णा शिंदे यांनी अतुल यांना वेळोवेळी फोनवरून धमक्या दिल्या आणि मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून १५ जून २०२५ रोजी अतुल कदम यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आईने दिलेल्या तक्रारीत हे स्पष्टपणे नमूद केले आहे की, सोनाली व कृष्णा यांच्या त्रासामुळेच आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे दिसते.
या प्रकरणात आरोपी सोनाली कदम हिला पुणे पोलिसांनी अटक केली असून गुरुवारी तिला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील रेणुका देशपांडे-कर्जतकर यांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणातील दुसरा आरोपी कृष्णा शिंदे अद्याप फरार असून त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. आरोपींनी संगनमताने अतुल यांना वारंवार त्रास दिला आहे. त्यांचा उद्देश काय होता, तसेच या गुन्ह्यामागे आणखी कोणी आहे का, याचा तपास करणे गरजेचे आहे.
तपासासाठी सोनाली कदम हिचा मोबाइल जप्त करण्यात आला असून आणखी पुरावे गोळा करण्यासाठी आणि साक्षीदारांची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची गरज असल्याचे सांगण्यात आले. न्यायालयाने ही मागणी मान्य करत आरोपी सोनाली कदम हिला १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ही घटना केवळ कौटुंबिक कलहापुरती मर्यादित राहिलेली नसून, मानसिक त्रासामुळे एका व्यक्तीने आयुष्य संपवण्याचा घेतलेला निर्णय अनेक प्रश्न निर्माण करतो. अशा प्रकारच्या घटनांमुळे विवाहातील पारस्परिक विश्वास आणि समाजातील नातेसंबंधांची गुंतागुंत पुन्हा चर्चेत आली आहे.