Pune News: पुण्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’विरोधात कठोर कारवाई, दोन तरुणांना कारावास व दंड
Pune News: पुण्यात 'ड्रंक अँड ड्राईव्ह'विरोधात कठोर कारवाई, दोन तरुणांना कारावास व दंड
Pune News: पुण्यात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या दोन तरुणांना न्यायालयाने 15 दिवसांची कैद व दंडाची शिक्षा सुनावली. या कारवाईमुळे ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ करणाऱ्यांवर कठोर संदेश देण्यात आला आहे.
सायली मेमाणे
पुणे २२ सप्टेंबर २०२५ : Pune News: पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. विशेषतः दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर न्यायालयाने दिलेला अलीकडचा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयाने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या दोन प्रकरणांमध्ये दोन तरुणांना शिक्षा सुनावली असून, या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांना कडक संदेश देण्यात आला आहे.
पहिल्या प्रकरणात, पिंपळे गुरव येथील 29 वर्षीय रोहित शैलेंद्र वर्मा याला न्यायाधीश एस. बी. पाटील यांनी 15 दिवसांची साधी कैद आणि ₹12,000 दंड ठोठावला. वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम 184, 185 आणि 3/181 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा (4979/2024) दाखल केला होता. दुसऱ्या प्रकरणात, नांदेड सिटी, पुणे येथील 31 वर्षीय राजकुमार मांगीणी कुलाल याला त्याच न्यायालयाने 15 दिवसांची साधी कैद आणि ₹10,000 दंडाची शिक्षा ठोठावली. त्याच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 आणि 185 अंतर्गत गुन्हा (01/2025) दाखल होता. दोन्ही सुनावण्यांमध्ये सरकारी वकील वर्षा राणी जाधव यांनी सरकारची बाजू मांडली, तर पोलीस निरीक्षक रुनाल मुल्ला आणि पीएसआय विकास पाटील यांनी कार्यवाहीचे पर्यवेक्षण केले.
पुणे शहरात गेल्या काही वर्षांत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या प्रकरणांत लक्षणीय वाढ झाली आहे. वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये 2,017, 2021 मध्ये 69, 2022 मध्ये 37, 2023 मध्ये 562 आणि 2024 मध्ये तब्बल 5,293 गुन्हे नोंदवले गेले. यावर्षी (2025) आतापर्यंत 3,948 प्रकरणे नोंदली गेली आहेत. या आकडेवारीतून हे स्पष्ट होते की, पुण्यात दारूच्या नशेत गाडी चालवण्याच्या घटना सतत वाढत आहेत.
वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई आणि न्यायालयाचे कडक निर्णय यामुळे अशा गुन्हेगारांवर वचक बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. दारूच्या नशेत वाहन चालवणे हे केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतर निरपराध नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करणारे कृत्य आहे. अनेकदा अपघातांमध्ये निरपराध लोकांचे प्राण जातात, त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या या शिक्षेमुळे इतर वाहनचालकांना देखील धडा मिळेल.
शहरातील वाढत्या वाहतुकीसोबतच वाहनचालकांनी सुरक्षिततेचे नियम पाळणे हे गरजेचे आहे. सध्या ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या घटनांवर पोलिसांनी चालवलेले विशेष अभियान अधिक कठोर करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले तर अपघातांचे प्रमाण घटेल आणि शिस्तबद्ध वाहतूक संस्कृती रुजेल. न्यायालयाचा अलीकडील निर्णय हा फक्त दोन व्यक्तींवरील कारवाई नसून, तो संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे. पुण्यातील तरुणाईने व इतर वाहनचालकांनी या निर्णयातून बोध घेऊन जबाबदारीने वाहन चालवणे आवश्यक आहे.