पुणे गणेश विसर्जन 2025 : मानाच्या गणपतींचे वेळापत्रक आणि नियमावली जाहीर

0
Pune Ganesh Visarjan 2025 : मानाच्या गणपतींचे वेळापत्रक आणि नियमावली जाहीर

Pune Ganesh Visarjan 2025 : मानाच्या गणपतींचे वेळापत्रक आणि नियमावली जाहीर

पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी मानाच्या गणपतींचं वेळापत्रक व नियम जाहीर केले. 6 सप्टेंबरला पारंपरिक मिरवणूक शिस्तीत पार पाडण्याचे आवाहन.

सायली मेमाणे

पुणे ४ सप्टेंबर २०२५ : पुणे शहर गणेशोत्सवाच्या पारंपरिक वैभवासाठी ओळखले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी नयनरम्य मिरवणुकीत मानाचे गणपती विसर्जनासाठी निघतात आणि शहराची रात्रभर जागरण करून भक्तिमय उत्सवमूर्तीची शोभायात्रा पाहण्याची खास परंपरा आहे. यावर्षी अनंत चतुर्दशी शनिवार, 6 सप्टेंबर रोजी येत असून पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पारंपरिक मिरवणुकीत शिस्त राखण्यासाठी पुणे पोलिसांनी वेळापत्रक व नियमावली जाहीर केली आहे.

मानाचे गणपती ठराविक क्रमाने आणि वेळापत्रकानुसार मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सकाळी 9:15 वाजता पहिला मानाचा कसबा गणपती टिळक पुतळ्यासमोर पोहोचेल आणि सकाळी 9:30 वाजता या मिरवणुकीला सुरुवात होईल. त्यानंतर 10:15 वाजता कसबा गणपती लक्ष्मी रोडकडे प्रस्थान करेल. सकाळी 10:30 वाजता दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडकडे जाईल. दुपारी 1 वाजता सहावा मानाचा महापालिका गणपती व सातवा मानाचा त्वेष्ट कासार गणपती मिरवणुकीत सामील होतील. दुपारी 3:45 नंतर लक्ष्मी रोड आणि शिवाजी रोडवरील मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील. यानंतर दुपारी 4 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीत सामील होणार आहे. संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर जिलब्या मारुती व अखिल मंडई गणपती मंडळे मिरवणुकीत सहभागी होतील.

या भव्य मिरवणुकीत शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी कठोर नियम लागू केले आहेत. टिळक पुतळा ते बेलबाग चौक या दरम्यान ढोल-ताशा वाजवण्यास सक्त मनाई आहे. बेलबाग चौकानंतरच ढोल-ताशा वादनास परवानगी दिली जाईल. प्रत्येक मंडळाला फक्त एक DJ किंवा एक ढोल-ताशा पथक ठेवण्याची परवानगी आहे. प्रत्येक ढोल-ताशा पथकात जास्तीत जास्त 60 सदस्य असू शकतात. मिरवणुकीदरम्यान मंडळांनी योग्य अंतर ठेवून रेषा न तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच, कसबा गणपती अलका टॉकीज चौकाजवळ पोहोचेपर्यंत इतर मंडळांना तिथे थांबण्याची परवानगी दिली जाणार नाही. टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोडवरील मिरवणुका सकाळी 10:30 पूर्वी सुरू होऊ शकणार नाहीत. बेलबाग चौकात परिशिष्ट 1, 2 आणि 3 मधील मंडळांना प्राधान्य दिले जाणार असून इतर मंडळांना प्रथम येणाऱ्याला प्रथम संधी या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल.

पुणे पोलिस आयुक्तालयाने पत्रकार परिषदेत या नियमांची माहिती देत नागरिकांनी शिस्त पाळावी व मिरवणूक शांततेत पार पाडावी असे आवाहन केले आहे. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीकडे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर देश-विदेशातील भाविकांचे लक्ष लागलेले असते. त्यामुळे पोलिसांनी केलेली ही नियोजनबद्ध तयारी पुण्याच्या गणेशोत्सवाला अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित बनवणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *