Pune Municipal Election 2026: गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 20 उमेदवार; यादी मुख्यमंत्र्यांकडे, गजा मारणेच्या कॉलमुळे पोलीस अलर्ट
Pune Municipal Election 2026: गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 20 उमेदवार; यादी मुख्यमंत्र्यांकडे, गजा मारणेच्या कॉलमुळे पोलीस अलर्ट
पुणे महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 20 उमेदवारांची यादी पुणे पोलिसांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवली आहे. गजा मारणेच्या कॉलमुळे पोलीस सतर्क झाले आहेत.
पुणे ८ जानेवारी २०२६ : पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. विविध राजकीय पक्षांनी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इच्छुकांना तिकीट दिल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी थेट कारवाई करत अशा उमेदवारांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवली आहे. या यादीत छोटे-मोठे गुन्हे दाखल असलेल्या तब्बल 20 उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांमुळे निवडणूक प्रक्रियेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पुणे पोलिसांकडून यासाठी स्वतंत्र निरीक्षण समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती अशा सर्व उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. निवडणूक काळात कोणताही दबाव, दहशत किंवा गैरप्रकार होऊ नये, यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
या यादीत काही कुख्यात नावांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे. सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे, तसेच गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकर यांचा या यादीत समावेश असल्याची माहिती आहे. या सर्व उमेदवारांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून निवडणूक लढवत आहेत. सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर अपक्ष उमेदवार असून, जयश्री मारणे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणी कोमकर या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत, तर बापू नायर हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून उमेदवार आहेत.
दरम्यान, कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याच्या हालचालींमुळे पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. कोथरूड परिसरातून जयश्री मारणे महापालिका निवडणूक लढवत असून, त्यांना मदत करण्यासाठी गजा मारणे काही नागरिकांना दूरध्वनी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या कॉल्समुळे मतदारांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या असून, त्यामुळे मारणेच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कडक तयारी सुरू केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार, त्यांचे नातेवाईक आणि समर्थक यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जात आहे. कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार रिंगणात उतरल्याने राजकीय पक्षांच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट यादी पोहोचल्याने आता यावर सरकार काय निर्णय घेते, तसेच अशा उमेदवारांवर कोणती ठोस कारवाई होते, याकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information