Pune News : बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालकपदावर मृत्युंजय महापात्रा यांची निवड; राज्यातील बड्या नेत्याच्या भावाला मोठा झटका
राज्यातील बड्या नेत्याच्या भावाला मोठा झटका
बँक ऑफ महाराष्ट्रच्या समभागधारक संचालक निवडणुकीत मृत्युंजय महापात्रांचा विजय; बड्या नेत्याच्या भावाचा पराभव, संस्थात्मक समर्थन मिळालं नाही.
सायली मेमाणे
पुणे ३ जुलै २०२५ : पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या समभागधारक संचालक पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत, सिंडिकेट बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मात्र, राज्यातील एका प्रभावशाली नेत्याच्या भावाला यामध्ये मोठा धक्का बसला असून, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांचे सहकार्य न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला, अशी माहिती समोर आली आहे.
ही निवडणूक समभागधारकांच्या मतांद्वारे झाली असून, मतांचे मूल्य समभागांच्या संख्येवर आधारित होते. महापात्रा यांना जरी ५०७ मतदारांचे समर्थन मिळाले असले तरी त्यांचे मतमूल्य ६५ कोटी ३० लाख रुपये होते. दुसरीकडे, पराभूत उमेदवाराला ८१३ मतदारांचा पाठिंबा लाभला, परंतु त्यांचे मतमूल्य फक्त ६ कोटी ९६ लाख इतकेच होते. यावरून स्पष्ट होते की, संस्थात्मक गुंतवणूकदारांची मते महत्त्वाची ठरतात.
बँकेचे उपसरव्यवस्थापक व कंपनी सचिव विशाल सेठीया यांनी मुंबई शेअर बाजाराला (BSE) यासंदर्भातील अधिकृत माहिती कळवली आहे. ६५ वर्षीय मृत्युंजय महापात्रा यांना बँकिंग क्षेत्रातील तीन दशके अधिकचा अनुभव असून, त्यांनी सिंडिकेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बँकेच्या संचालक मंडळात अनुभवसंपन्न नेतृत्वाची भर पडली आहे.
दरम्यान, पराभूत उमेदवाराचे वडील ही बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे दीर्घकालीन नेते होते. मराठी प्रतिनिधित्व वाढवण्याच्या हेतूने त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यांनी छोट्या-मोठ्या समभागधारकांशी थेट संपर्क साधत, तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा केला. मात्र, त्याला अपेक्षित यश लाभले नाही. राष्ट्रीयीकृत सरकारी विमा कंपनीकडून सहकार्य मिळाले असते, तर निकाल वेगळा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा निकाल स्पष्ट करतो की, बँकांच्या संचालक मंडळावर निवडून येण्यासाठी केवळ लोकप्रियता किंवा राजकीय पाठबळ पुरेसं नसून, संस्थात्मक पाठिंबा आणि व्यापक वित्तीय विश्वास आवश्यक असतो. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये यापुढेही अशा व्यावसायिक नेतृत्वामुळे निर्णय प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.