पुण्यात महिलांसाठी पिंक रिक्षा उपक्रम: झेन्सार फाउंडेशनद्वारे रोजगार व आर्थिक सक्षमीकरण
पुण्यात महिलांसाठी पिंक रिक्षा उपक्रम: झेन्सार फाउंडेशनद्वारे रोजगार व आर्थिक सक्षमीकरण
पुण्यात झेन्सार फाउंडेशन आणि आस्था सोशलच्या पुढाकाराने शंभर महिलांना पिंक रिक्षा प्रशिक्षण व परवाना देऊन रोजगार उपलब्ध; महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व आत्मविश्वास वाढवण्याचा उपक्रम.
सायली मेमाणे
पुणे १२ सप्टेंबर २०२५ : पुण्यातील झेन्सार फाउंडेशन व आस्था सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने शंभर महिलांना पिंक रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. खराडीतील झेन्सार कंपनीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात सहभागी महिलांना प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण करण्यात आले आणि पहिल्या टप्प्यात वीस जणींना अर्थसाह्यायातून पिंक रिक्षा देण्यात आल्या.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश शहरातील गरजू महिलांना आर्थिक साक्षरता, उद्योजकतेचे कौशल्य व रिक्षा ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे हा आहे. सहा आठवड्यांचे हे प्रशिक्षण संपन्न झाले असून, सहभागी महिलांना रिक्षा चालविण्याचे कौशल्य व व्यवसायिक तयारी याची पूर्ण माहिती मिळाली आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जयश्री पाटील यांनी या उपक्रमाबाबत सांगितले की, “हा उपक्रम फक्त रोजगार निर्माण करणारा नाही, तर महिलांच्या आत्मसन्मानाला नवे पंख देणारा आहे.” या उपक्रमामुळे महिलांना केवळ रोजगार मिळत नाही, तर त्यांचा आत्मविश्वासही वृद्धिंगत होतो.
व्होरा बजाज कंपनीचे बाळासाहेब जाधव म्हणाले, “महिलांना रिक्षा चालवण्यासाठी तांत्रिक व आर्थिक साह्य देणे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.” प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनी सांगितले की, “या प्रशिक्षणामुळे मला फक्त रोजगार मिळालाच नाही, तर आत्मविश्वासही आला आहे. मी घरची कामे पूर्ण करून रिक्षा घेऊन व्यवसायासाठी बाहेर पडते आणि सायंकाळी सातपर्यंत सातशे ते आठशे रुपयांचा व्यवसाय करते. घरासाठी काहीतरी मदत करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद होत आहे.”
कॉसमॉस बँकेच्या मुख्य व्यवस्थापक स्वाती नलावडे यांनी या उपक्रमाला कौतुक करत सांगितले की, “कॉसमॉस बँक नेहमीच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कटिबद्ध राहते.” कार्यक्रमाचे संयोजन झेन्सार कंपनीचे सी.एस.आर. प्रमुख भानुश्री शर्मा व गुरुराज कुलकर्णी यांनी केले.
या पिंक रिक्षा उपक्रमामुळे पुण्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळाली असून, या उपक्रमामुळे त्यांचे आत्मविश्वास व व्यवसायिक कौशल्य वाढले आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनवणे हा उपक्रमाचा मुख्य हेतू ठरला आहे. यामुळे भविष्यात अशा पुढाकारांमुळे शहरातील महिलांचा आर्थिक विकास आणि सामाजिक सक्षमीकरण वाढेल असा अपेक्षित आहे.