Pune Tourism Festival 2026: पुण्यात १६ ते १८ जानेवारीला पर्यटन महोत्सव; ७०हून अधिक कंपन्यांचा सहभाग
Pune Tourism Festival 2026: पुण्यात १६ ते १८ जानेवारीला पर्यटन महोत्सव; ७०हून अधिक कंपन्यांचा सहभाग
पुण्यात १६ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान ‘पुणे पर्यटन महोत्सव’ होणार असून, देश-विदेशातील सहलींचे पर्याय, खास सवलती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ७० पेक्षा अधिक पर्यटन कंपन्या सहभागी होणार आहेत.
पुणे १३ जानेवारी २०२६ : पुणे शहरात पर्यटनप्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकासासाठी भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘पुणे पर्यटन महोत्सव’ अर्थात पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल यंदा १६ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत हॉटेल सेंट्रल पार्क, डेक्कन, पुणे येथे होणार आहे. तीन दिवस चालणारा हा महोत्सव सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे. याबाबतची माहिती संस्थेचे चेअरमन प्रवीण घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे पर्यटन महोत्सवाचे यंदा सहावे वर्ष असून, दरवर्षी या महोत्सवाला पर्यटकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध गायिका डॉ. राधा मंगेशकर आणि पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भरत लांघी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात देशभरातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ७० पेक्षा अधिक नामांकित पर्यटन कंपन्या सहभागी होणार असून, विविध सहलींचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
या पर्यटन महोत्सवात कोकण, गोवा, काश्मीर, महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे, मानसरोवर यात्रा तसेच अमेरिका, युरोप, कॅलिफोर्निया यांसारख्या परदेशी सहलींचे नियोजन पर्यटकांना करता येणार आहे. लोकल टू ग्लोबल अशा विविध पर्यटन संधी या महोत्सवात खुल्या होणार आहेत. विशेष म्हणजे, महोत्सव कालावधीत सहलींची बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना अनेक पर्यटन कंपन्यांकडून आकर्षक सवलती देण्यात येणार आहेत.
महोत्सवात केवळ सहलींची माहितीच नव्हे, तर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कॉर्पोरेट ट्रॅव्हल अँड टुरिझम मीट, काश्मीर टुरिझम, महाराष्ट्र टुरिझम यावर चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. प्रसिद्ध गायिका डॉ. राधा मंगेशकर यांचे ‘एकटीचा सफरनामा’ हे अनुभवकथन देखील पर्यटकांना ऐकायला मिळणार आहे, ज्यामुळे महोत्सवाला वेगळीच सांस्कृतिक उंची मिळणार आहे.
या पर्यटन महोत्सवासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), पर्यटन संचालनालय, पर्यटन मंत्रालय, पुणे विमानतळ प्रशासन, पुणे रेल्वे स्टेशन, पासपोर्ट कार्यालय, मेट्रो प्रशासन, पीएमपीएल प्रशासन, ट्रॅव्हेल एजन्सी असोसिएशन्स, हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन्स, रिसॉर्ट्स असोसिएशन, कृषी पर्यटन असोसिएशन तसेच लोकल टूर गाईड्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध मान्यवर या महोत्सवात आपले विचार मांडणार आहेत.
महोत्सवात दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, अनेक पर्यटन कंपन्यांकडून खास योजना आणि ऑफर्स सादर केल्या जाणार आहेत. त्यामुळे पर्यटनप्रेमींसह कुटुंबीय, विद्यार्थी आणि कॉर्पोरेट प्रवासी यांच्यासाठी हा महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अधिकाधिक पुणेकरांनी आणि परिसरातील नागरिकांनी या पर्यटन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information