Purandar ZP Election 2026: पुरंदरमध्ये महायुतीचं नवं समीकरण? शिवतारे–जगताप युतीची जोरदार चर्चा
Purandar ZP Election 2026: पुरंदरमध्ये महायुतीचं नवं समीकरण? शिवतारे–जगताप युतीची जोरदार चर्चा
Purandar ZP Election 2026 पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग. आमदार विजय शिवतारे आणि भाजपचे संजय जगताप एकत्र येणार का, युतीमुळे कोणाचा फायदा-तोटा होणार यावर सविस्तर विश्लेषण.
पुणे २० जानेवारी २०२५: Purandar ZP Election 2026 च्या पार्श्वभूमीवर सासवड, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असून पुरंदर तालुक्यातील राजकीय सारीपाट पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर सर्वच पक्षांनी “एकला चलो”ची भूमिका मागे ठेवत संभाव्य युती आणि आघाड्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे आणि भाजपचे नेते संजय जगताप एकत्र येणार का, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
संपूर्ण राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची नैसर्गिक महाविकास आघाडी मानली जाते, तर शिवसेना आणि भाजपची महायुती सत्तेत आहे. मात्र सत्तेच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे दोन-दोन गट झाल्याने स्थानिक पातळीवर गणिते अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. पुरंदर तालुक्यात सध्या विजय शिवतारे यांची शिवसेना मजबूत स्थितीत असून उद्धव ठाकरे गटाची ताकद मर्यादित आहे. दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार गट स्वतंत्रपणे फारसे प्रभावी नसले, तरी हे दोन्ही गट एकत्र आले तर त्यांची मते नेहमीच निर्णायक ठरतात.
राज्यात शिवसेना-भाजपची अधिकृत महायुती असली तरी पुरंदरमध्ये विजय शिवतारे आणि संजय जगताप यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ही युती प्रत्यक्षात उतरेल का, याबाबत साशंकता आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सर्वच पक्ष आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून तात्पुरत्या युतीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. जर पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र लढले, तर शिवसेना आणि भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. कारण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ नसल्याचा फटका संजय जगताप यांना बसलेला आहे.
पुरंदर तालुक्यात भाजपची ताकद मोठी असली तरी विविध गटगणांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांचे स्वतंत्र वर्चस्व आहे. गराडे गणात गंगाराम जगदाळे, दिवे गणात बाबाराजे जाधवराव, तर नीरा कोळविहीरे भागात माजी आमदार अशोक टेकवडे यांची ताकद आहे. अनेक ठिकाणी भाजप नेते आपल्या नातेवाईकांसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याने अंतर्गत स्पर्धा वाढली आहे. याचा परिणाम म्हणून संजय जगताप यांचे अनेक समर्थक उमेदवारीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत आहेत.
सहकार क्षेत्रात मात्र संजय जगताप यांचे जाळे भक्कम मानले जाते. कात्रज दूध संघ, जिल्हा बँक, नीरा बाजार समिती, विकास सोसायट्या आणि सोमेश्वर साखर कारखाना यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या मदतीने मजबूत पकड निर्माण केली आहे. याउलट विजय शिवतारे सहकार क्षेत्रापासून आतापर्यंत दूर राहिले आहेत. शिवतारे-जगताप युती झाली, तर शिवतारे यांना सहकार क्षेत्रात प्रवेश करणे सोपे जाईल आणि त्याचा फायदा प्रामुख्याने शिवतारे यांनाच होईल, तर संजय जगताप यांना राजकीय नुकसान सहन करावे लागू शकते.
म्हणूनच अनेक जाणकारांच्या मते संजय जगताप यांच्यासाठी राष्ट्रवादीशी जवळीक ठेवणे अधिक सोयीचे ठरू शकते. मात्र पक्षाच्या आदेशानुसार महायुती झाली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संजय जगताप यांच्यासाठी ही युती धोक्याची घंटा ठरू शकते, अशी चर्चा सध्या पुरंदरच्या राजकारणात रंगली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information