Raigad Flood Threat: 900 एकर शेती पाण्याखाली जाण्याचा धोका, खारबंदिस्ती फुटण्याची भीती
900 एकर शेती पाण्याखाली जाण्याचा धोका, खारबंदिस्ती फुटण्याची भीती
Raigad जिल्ह्यातील पेण तालुक्यात खारबंदिस्तीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे 900 एकर शेतीवर पूराचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
सायली मेमाणे
Raigad ५ जुलै २०२५ : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट भागातील कणे – कोप्रोली येथे शेतकऱ्यांसाठी गंभीर संकट निर्माण झाले आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे खारबंदिस्तीचे काम केल्याने संपूर्ण 900 एकर शेती पावसाच्या पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही खारबंदिस्ती फुटली, तर शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे संबंधित ठेकेदारासोबतच देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही शेतकऱ्यांनी जबाबदारी टाकली आहे.
पावसाळ्यातील पुरापासून भातशेतीचे संरक्षण करण्यासाठी खारबंदिस्ती ही संकल्पना या भागात अनेक वर्षांपासून राबवली जाते. पूर्वी ग्रामस्थांनी स्वतः उभारलेल्या बंदिस्ती मजबूत असायच्या. मात्र आता आधुनिक यंत्रणा असूनही काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने शासनाच्या कामकाजात भ्रष्टाचार होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
हा प्रकल्प जवळपास 9 ते 10 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत आहे. 26 जानेवारी रोजी या कामाचा शुभारंभ झाला होता. पण सुरुवातीपासूनच ठेकेदाराने कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज पावसाच्या पाण्यामुळे ही बंदिस्ती वाहून जाण्याच्या मार्गावर आहे. गंभीर बाब म्हणजे, ठेकेदाराने पाणी अडवण्यासाठी केवळ बांबू लावण्यासारखे तात्पुरते उपाय केले आहेत, जे कोणत्याही आपत्तीला थोपवू शकत नाहीत.
शेतकऱ्यांनी आपली शेती वापरण्यास परवानगी दिली होती, परंतु बदल्यात त्यांना ना नुकसानभरपाई मिळाली ना शेत नांगरून दिले गेले. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्राम समिती अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे व ग्रामस्थ श्रीकांत पाटील यांनी निकृष्ट कामाचा निषेध करत प्रशासनावर टीका केली आहे.
या संपूर्ण प्रकल्पात ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबरोबरच प्रशासनाचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी आंदोलने, निवेदने दिल्यानंतरही वरिष्ठ स्तरावर काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे ही जबाबदारी पूर्णपणे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
32 वर्षांनंतर होणारे हे काम शेतकऱ्यांसाठी मोठ्या आशेचे कारण होते. पण त्यावर पाणी फिरल्याने आता त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी डळमळीत होण्याची शक्यता आहे. केवळ पिण्याच्या पाण्याच्या समस्येपुरती मर्यादित न राहता आता ही जनता आपल्या शेतीसाठीही लढत आहे, यावरून शासनाच्या अकार्यक्षमतेचा स्पष्ट अंदाज येतो.
हा प्रकार रायगड जिल्ह्यातील पूर नियोजनाच्या बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित करतो. पावसाळ्यातील सुरक्षेसाठी आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter