Railway Ticket Booking: आता पोस्ट ऑफिसमधूनही रेल्वे तिकीट! स्टेशनवर रांगेत उभे राहण्याची गरज नाही
Railway Ticket Booking: आता पोस्ट ऑफिसमधूनही रेल्वे तिकीट! स्टेशनवर रांगेत उभे राहण्याची गरज नाही
रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी आता स्टेशनवर जाण्याची किंवा ऑनलाइन त्रास घेण्याची गरज नाही. भारतीय रेल्वे आणि डाक विभागाने एकत्र येऊन पोस्ट ऑफिसमधून तिकीट बुकिंगची नवी सुविधा सुरू केली आहे. सध्या पुणे विभागातील इचलकरंजी आणि उरुळी कांचन येथे ही सेवा उपलब्ध आहे.
सायली मेमाणे
४ ऑक्टोबर २०२५ : रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत सोयीस्कर अशी नवी सुविधा भारतीय रेल्वे आणि भारतीय डाक विभागाने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आता प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर लांब रांगेत उभे राहण्याची किंवा ऑनलाइन तांत्रिक अडचणींचा सामना करण्याची आवश्यकता राहणार नाही. कारण आता पोस्ट ऑफिसमधूनच रेल्वेचे आरक्षण तिकीट बुक करता येणार आहे.
ही नवी सुविधा सध्या देशातील निवडक पोस्ट कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे रेल्वे विभागातील इचलकरंजी (CP कोड ८२५) आणि उरुळी कांचन (CP कोड ८७७) या पोस्ट कार्यालयांमध्ये ती सुरू करण्यात आली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीत इचलकरंजी येथून ५२२७ प्रवाशांनी आणि उरुळी कांचन येथून १६७८ प्रवाशांनी या माध्यमातून तिकिटे बुक केली आहेत. सरासरी दररोज अनुक्रमे २८ आणि ९ तिकिटे या दोन केंद्रांमधून जारी केली जात आहेत.
रेल्वे प्रवाशांसाठी ही सुविधा विशेषतः त्या भागांमध्ये उपयुक्त ठरणार आहे, जिथे ऑनलाइन बुकिंगसाठी इंटरनेटची सोय नाही किंवा स्टेशनवर तिकीट खिडकीपर्यंत पोहोचणे अवघड जाते.
तिकीट बुकिंगची प्रक्रिया:
रेल्वे तिकीट फक्त अशा पोस्ट ऑफिसमधूनच काढता येते, जिथे पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिम (PRS) टर्मिनल बसवलेले आहे. प्रवाशाने सर्वप्रथम आपल्या परिसरातील असे पोस्ट ऑफिस शोधावे, जिथे ही सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतर प्रवासाची माहिती — जसे की प्रस्थान व गंतव्य स्थान, तारीख, ट्रेनचे नाव किंवा क्रमांक, आणि तिकीट श्रेणी — भरून फॉर्म सादर करावा. पेमेंट केल्यानंतर तिकीट तिथेच मुद्रित करून दिले जाते.
रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले की, या तिकीट बुकिंग प्रक्रियेने ग्रामीण आणि उपनगरी भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. अनेकदा रेल्वेच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींमुळे बुकिंग थांबते किंवा मोबाईल अॅप काम करत नाही. अशा वेळी पोस्ट ऑफिसचा पर्याय प्रवाशांना अत्यंत उपयोगी ठरणार आहे.
रेल्वे विभागाची प्रतिक्रिया:
पुणे रेल्वे विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी सांगितले की, “पुणे विभागातील इचलकरंजी आणि उरुळी कांचन या पोस्ट कार्यालयांत रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही तिकिटे फिजिकल स्वरूपात देण्यात येतात आणि त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेत भर पडत आहे.”
रेल्वे आणि डाक विभागाच्या या संयुक्त उपक्रमामुळे नागरिकांना ग्रामीण पातळीवर डिजिटल सेवांचा लाभ मिळेल. तिकिट बुकिंगसाठी प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचणार असून, पारंपरिक पद्धतीने रेल्वे प्रवास अधिक सुलभ होणार आहे.