Rain Update : मुंबई-पुण्यात पावसाची हजेरी; विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
मुंबई, पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, धरण साठ्यात वाढ..
सायली मेमाणे
२४ जून २०२५ : मुंबई – महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असून, कोकण, मुंबई, पुणे, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईत गेल्या रात्रीपासून हलक्या ते मध्यम सरी कोसळत असून, पुढील दोन दिवस अशाच स्वरूपाचा पाऊस सुरू राहणार असल्याची शक्यता आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, रायगड, सातारा आणि रत्नागिरी या घाटमाथ्याच्या जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहील, अशी शक्यता आहे.
कोकणाच्या तुलनेत विदर्भात पाऊस तुलनेने कमी होता, मात्र आता येत्या पाच दिवसांत विदर्भातही पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २४ ते २७ जूनदरम्यान नागपूरसह अनेक जिल्ह्यांत जोरदार वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाचा तडाखा बसू शकतो.
दरम्यान, पुण्यातील धरण साखळी क्षेत्रात मागील चार दिवसांपासून मध्यम ते जोरदार पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा वाढत आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांपैकी खडकवासला धरणात सध्या 63.60 टक्के, पानशेतमध्ये 34.07 टक्के, वरसगावमध्ये 42.99 टक्के तर टेमघरमध्ये 23.68 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. चारही धरणांचा एकूण साठा सध्या 38.67 टक्क्यांवर पोहोचला असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक समाधानकारक स्थिती आहे. मागील वर्षी याच दिवशी केवळ 12.32 टक्के साठा नोंदवला गेला होता.
पावसामुळे घाटमाथा, खोलगट भाग, शहरांतील वाहतूक आणि वीजपुरवठा यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz