Rohit Arya Encounter: रोहित आर्याचे धक्कादायक पुणे कनेक्शन! कुख्यात गँगस्टरशी संबंध आणि बांधकाम प्रकल्पांचा तपास सुरू
रोहित आर्याचे धक्कादायक पुणे कनेक्शन! कुख्यात गँगस्टरशी संबंध आणि बांधकाम प्रकल्पांचा तपास सुरू
मुंबई पवईतील ओलीस प्रकरणात ठार झालेल्या रोहित आर्याचे पुण्याशी धक्कादायक संबंध समोर आले आहेत. कोथरूड आणि कर्वेनगरमध्ये वास्तव्य, गँगस्टर हाजी मस्तानच्या मुलाशी मैत्री, बांधकाम प्रकल्प आणि राजकीय संबंधांची चौकशी सुरू आहे.
सायली मेमाणे
पुणे ३१ ऑक्टोबर २०२५ : मुंबई : पवईतील आर ए स्टुडिओमध्ये 16 मुलांना ओलीस ठेवून खळबळ उडवणाऱ्या आणि नंतर एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या रोहित आर्या या व्यक्तीच्या पार्श्वभूमीबाबत नवे तपशील समोर येत आहेत. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजवली असताना आता त्याचे पुण्याशी असलेले संबंध उघड झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित आर्या हा मूळचा पुण्यातील कोथरूड परिसरातील रहिवासी असून, त्याचे संबंध बांधकाम क्षेत्र आणि काही प्रभावशाली व्यक्तींशी होते.
रोहित आर्या हा कर्वेनगरमधील अमेय अपार्टमेंटमध्ये काही काळ वास्तव्यास होता. या ठिकाणाहून त्याने सुमारे एक वर्षापूर्वी घर सोडले होते. त्याचे आई-वडील मात्र कोथरूडमधील शिवतीर्थनगर परिसरातील स्वरांजली अपार्टमेंटमध्ये राहत होते. रोहित आणि त्याची पत्नी अधूनमधून पुण्यात येऊन पालकांना भेटत असत. स्वरांजली अपार्टमेंटमधील घर हे हरोळीकर या नावाने असल्याचे समोर आले असून, त्यामुळे रोहित आर्याचे खरे नाव रोहित हरोळीकर असल्याची माहिती मिळत आहे. त्याची पत्नी एका नामांकित बँकेत नोकरी करत असल्याचे देखील उघड झाले आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रोहित आर्याची ओळख एका कुख्यात गँगस्टरशी असल्याची माहिती समोर आली आहे. हाजी मस्तानच्या मुलासोबत त्याचे घनिष्ठ संबंध होते. या दोघांनी मिळून पुण्यात बांधकाम व्यवसाय सुरू केला होता आणि कोथरूड, बाणेर तसेच हिंजवडी परिसरात काही मोठे प्रकल्प हाताळले होते. या प्रकल्पांमधून त्यांनी मोठा नफा कमावला होता, ज्यामुळे रोहित आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला.
याच आर्थिक स्थैर्यानंतर त्याचा राजकीय प्रभाव देखील वाढू लागला. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काही उमेदवारांना तो आणि त्याचे सहकारी आर्थिक व रणनीतीसंबंधी मदत करत होते. त्यामुळे रोहितचे नाव राजकीय व व्यावसायिक वर्तुळात चर्चेत आले होते. त्याची पुण्यातील उपस्थिती वाढत असताना अचानक तो मुंबईत हलला आणि नंतरच पवईतील ओलीस प्रकरणाने सर्वत्र धक्का बसला.
अनेक सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित आर्याने राज्य सरकारकडून आपले काही पैसे बुडाल्याचा आरोप केला होता आणि त्याच कारणावरून त्याने पवईतील आर ए स्टुडिओमध्ये हे धक्कादायक कृत्य केल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने ऑडिशनच्या नावाखाली सुमारे 16 जणांना ओलीस ठेवले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत त्याला ठार केले आणि सर्व बंधकांची सुटका केली.
दरम्यान, त्याच्या पुण्यातील राहत्या घरांवर पोलिसांनी छापे टाकले असून, कोथरूडमधील स्वरांजली अपार्टमेंट आणि कर्वेनगरमधील ठिकाणांवर तपास सुरू आहे. गुरुवारी त्याच्या कोथरूडमधील घराला कुलूप असल्याचे दिसून आले, तर स्थानिकांनी त्याच्याबद्दल बोलण्यास नकार दिला. पोलिसांकडून त्याच्या बांधकाम व्यवसाय, बँक व्यवहार आणि गँगस्टर कनेक्शन याबाबत तपास सुरू असल्याचे कळते.
रोहित आर्याचा हा संपूर्ण प्रवास — बांधकाम क्षेत्रातील यशापासून ते गुन्हेगारीकडे झालेला कल — राज्यातील तपास यंत्रणांसाठी एक मोठा प्रश्न बनला आहे.