Satej Patil Allegations: हेलिकॉप्टर आणि अनधिकृत उत्खनन प्रकरणात सतेज पाटील यांचे गंभीर आरोप

0
हेलिकॉप्टर आणि अनधिकृत उत्खनन प्रकरणात सतेज पाटील यांचे गंभीर आरोप

हेलिकॉप्टर आणि अनधिकृत उत्खनन प्रकरणात सतेज पाटील यांचे गंभीर आरोप

Satej Patil Allegations: हातकणंगले तालुक्यातील बेकायदेशीर दगड उत्खनन प्रकरणी आमदार सतेज पाटील यांचे गंभीर आरोप, व्यावसायिक शिवाजी पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिले प्रत्युत्तर.

सायली मेमाणे

कोल्हापूर ११ जुलै २०२५ : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत दगड उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे सदस्य सतेज पाटील यांनी केला आहे. विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करत पाटील यांनी विचारले की, “दगड खाणीत उत्खनन करणारा जर हेलिकॉप्टर घेऊ शकतो, तर शासनाला किती रॉयल्टी मिळाली पाहिजे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.

या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी टोप कासारवाडी परिसरातील व्यावसायिक शिवाजी पोवार यांनी थेट पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांनी हेलिकॉप्टर स्वतःच्या वैध उत्पन्नातून घेतले असून खाणीच्या उत्पन्नाशी याचा काहीही संबंध नाही. यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले असल्याचेही स्पष्ट केले.

पाटील यांनी विधान परिषदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गट क्रमांक १४४ मध्ये प्रत्यक्षात ४ लाख ब्रास उत्खनन झाले असतानाही केवळ ९६ हजार ब्रास दाखवले गेले आणि १०० कोटी रुपयांची रॉयल्टी न भरता अपारदर्शक व्यवहार केले गेल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच दोन वर्षांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या असूनही अजून पैसे वसूल झाले नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

या आरोपांनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले असून ड्रोन आणि जीपीएसच्या साहाय्याने खाणींचे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले. यामुळे संपूर्ण खाण व्यवस्थापनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

शिवाजी पोवार यांनी स्पष्ट केले की, संबंधित खाण २०१४ मध्येच महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली बंद करण्यात आली होती आणि सध्या जे काही बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे, त्याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांनी त्यात स्वतःचा सहभाग असण्याचे नाकारले.

दरम्यान, स्थानिक गावकऱ्यांनी असा आरोप केला आहे की टोप, शिये आणि कासारवाडी गावांमध्ये दररोज सुमारे १०० ते १२५ डंपरद्वारे बेकायदेशीर दगड वाहतूक केली जात आहे. संबंधित गटातील लीज रद्द करण्यात आली असून ७/१२ उताराही रद्द करण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यात दगड उत्खनन आणि महसूल वसुलीच्या प्रकरणांतील अपारदर्शकतेबाबत जनतेच्या मनात संताप निर्माण झाला आहे. शासनाकडून चौकशी, कठोर कारवाई आणि दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी मागणी जोर धरत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed