Shindavane Ghat Accident: उरुळी कांचन-जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात दोन टेम्पोंचा भीषण अपघात; चालकांचा थरारक जीव वाचला
उरुळी कांचन-जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात दोन टेम्पोंचा भीषण अपघात; चालकांचा थरारक जीव वाचला
Shindavane Ghat Accident: उरुळी कांचन-जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात दोन टेम्पोंचा वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाला. अपघातात मोठे नुकसान झाले, परंतु जीवितहानी टळली. दोन तरुणांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका चालकाचे प्राण वाचले.
सायली मेमाणे
पुणे ३ ऑक्टोबर २०२५ : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन-जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाट परिसरात सोमवारी (ता. 3 नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास दोन टेम्पोंचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सासवड बाजूकडून उरुळी कांचनकडे जाणारे दोन टेम्पो शिंदवणे घाटातून प्रवास करत होते. घाट परिसरातील रस्ता अरुंद व वळणावळणाचा असल्यामुळे चालकांनी सावधगिरीने वाहन चालवणे अपेक्षित असते. मात्र, पहिल्या घटनेत एका टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट रस्त्यालगत असलेल्या विद्युत पोलला ताणलेल्या तारेला धडकला. या धडकेत टेम्पोचे पुढील भाग पूर्णतः चुराडा झाला असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
दरम्यान, काही वेळातच दुसरी घटना देखील शिंदवणे घाटातच घडली. दुसऱ्या टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने वाहनाचे संतुलन बिघडले आणि टेम्पो रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. या टेम्पोत सुमारे ४ ते ५ जण प्रवास करत होते. अचानक झालेल्या अपघाताने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली, मात्र सुदैवाने सर्वजण सुखरूप बचावले. दोन्ही अपघातांत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवून बचाव कार्य सुरू केले. रस्त्यावरून जात असलेले शुभम धनवटे आणि उमेश राजगुरू या दोन तरुणांनी धाडस दाखवून एका टेम्पो चालकाचे प्राण वाचविले. स्थानिकांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली, त्यानंतर उरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली आणि अपघातग्रस्त वाहनं बाजूला केली.
शिंदवणे घाट हा उरुळी कांचन आणि जेजुरी मार्गावरील महत्त्वाचा घाट असल्यामुळे येथे वाहतुकीची वर्दळ कायम असते. मात्र, रस्त्याची अरुंद रचना, तीव्र वळणे आणि रस्त्यावरील खराब स्थितीमुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहनांचा वेग आणि तांत्रिक बिघाड यामुळे घाट परिसरात अपघातांच्या घटना घडतात.
या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीसह सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. घाट परिसरात वाहनचालकांसाठी चेतावणी फलक, साईन बोर्ड आणि वेगमर्यादा चिन्हे असली तरी अनेक चालक ती दुर्लक्षित करतात. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दोन्ही अपघातांबाबत नोंद घेतली असून टेम्पो चालकांची चौकशी सुरू आहे. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या घटनांमुळे पुन्हा एकदा शिंदवणे घाटातील रस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.