श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव उत्साहात; दिवसभर धार्मिक कार्यक्रमांनी पुणे भक्तिमय

0
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव उत्साहात; दिवसभर धार्मिक कार्यक्रमांनी पुणे भक्तिमय

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव उत्साहात; दिवसभर धार्मिक कार्यक्रमांनी पुणे भक्तिमय


पुण्यातील ऐतिहासिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा; अभिषेक, गणेशयज्ञ, अथर्वशीर्ष, नगरप्रदक्षिणा व महाआरतीला भाविकांची गर्दी.

पुणे 2३ जानेवारी २०२६ : पुणे शहरातील ऐतिहासिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव अत्यंत भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. भारतातील पहिले सार्वजनिक गणपती मंडळ म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात दिवसभर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

गणेश जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांची माहिती देताना उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी सांगितले की, परंपरा, संस्कृती आणि अध्यात्म जपण्याच्या उद्देशाने हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंदिर परिसर आणि रंगारी भवन आकर्षक फुलांची सजावट व रोषणाईने उजळून निघाले होते. पहाटे ५.३० ते सकाळी ८.३० या वेळेत श्रीगणेशाचा विधीवत अभिषेक करण्यात आला. या काळात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.

यानंतर सकाळची आरती कोह्लर इंडिया कॉर्पोरेशन प्रा. लि. चे सेल्स हेड सुहास कुलकर्णी व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते संपन्न झाली. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत गणेशयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर सरस्वती भजनी मंडळाच्या वतीने भक्तिरसाने ओथंबलेला भजन कार्यक्रम सादर करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.

दुपारी ४ ते ५ या वेळेत बीव्हीआय ग्रुपच्या वतीने अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी सामूहिक पठणात सहभाग घेतला. सायंकाळी गणेश जन्मोत्सवाचा मुख्य आकर्षण ठरलेली भव्य नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. श्रीगणेशाची पालखी फुलांनी सजवून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते.

नगरप्रदक्षिणेचा मार्ग फरासखाना, तांबडी जोगेश्वरी मंदिर, आप्पा बळवंत चौक, दक्षिणमुखी मारुती मंदिर असा होता. या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. फुलांची आकर्षक सजावट केलेली पालखी नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरली. संपूर्ण परिसर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

रात्री ८.३० वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. ही महाआरती हुतात्मा शिवराम हरि राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांच्या हस्ते पार पडली. महाआरतीनंतर भाऊ रंगारी भजनी मंडळाच्या वतीने भजन सादरीकरण करण्यात आले. या भजनांनी उपस्थित भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा अनुभव दिला.

या संपूर्ण कार्यक्रमाला ट्रस्ट अध्यक्ष संजीव जवळे, उत्सवप्रमुख पुनीत बालन, विश्वस्त, स्वयंसेवक तसेच पुणे शहरातील असंख्य गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरा, भक्ती आणि सांस्कृतिक वारसा जपत साजरा झालेला हा गणेश जन्मोत्सव पुणेकरांसाठी एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव ठरला.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *