पुण्यातील वारसाहक्काने चाललेलं ज्ञानाचं मंदिर: एक्सप्रेस बुक सर्व्हिसचा प्रेरणादायी प्रवास
पुण्यातील वारसाहक्काने चाललेलं ज्ञानाचं मंदिर: एक्सप्रेस बुक सर्व्हिसचा प्रेरणादायी प्रवास
जवाहरलाल नेहरूंपासून नारायण मूर्तींपर्यंत अनेक दिग्गजांनी भेट दिलेलं पुण्यातील एक्सप्रेस बुक सर्व्हिस हे भारतातील एक ऐतिहासिक पुस्तक दुकान आहे. वाचा त्याचा गौरवशाली प्रवास.
०३ जानेवारी २०२६ : पुण्याच्या कॅम्प परिसरात वसलेलं एक्सप्रेस बुक सर्व्हिस हे केवळ पुस्तक विक्रीचं दुकान नसून, गेल्या सात दशकांपासून ज्ञान, विचार आणि साहित्य संस्कृती जपणारा एक जिवंत वारसा आहे. १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला स्थापन झालेलं हे पुस्तकालय आजही वाचक, लेखक आणि विचारवंतांसाठी एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. देशाच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक इतिहासात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या दुकानाने अनेक पिढ्यांना वाचनाची गोडी लावली आहे.
एक्सप्रेस बुक सर्व्हिसला भेट देणाऱ्या व्यक्तींची यादी पाहिली तर भारताच्या सामाजिक, राजकीय, उद्योग, कला आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा इतिहासच डोळ्यासमोर उभा राहतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, उद्योगविश्वातील आदर्श दाम्पत्य सुधा व नारायण मूर्ती, शास्त्रीय संगीत सम्राट भीमसेन जोशी, गझल सम्राट जगजीत सिंग, पंकज उदास, चित्रपटसृष्टीतील राज कपूर, लता मंगेशकर, डिंपल कपाडिया, तसेच जे.आर.डी. टाटा, रतन टाटा, आर. गोपालकृष्णन, रघुनाथ माशेलकर, सायमन टॉफेल आणि ओशो यांसारख्या थोर व्यक्तींनी या दुकानाला भेट दिली आहे. या भेटींमुळे एक्सप्रेस बुक सर्व्हिसला केवळ व्यावसायिक नव्हे तर ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
या पुस्तक दुकानात अनेक पुस्तकांचे प्रकाशन सोहळे आणि संगीत अल्बमचे अनावरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आजवर चार हजारांहून अधिक लेखकांना त्यांच्या पुस्तकांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आहे. नारायण मूर्ती, नंदन नीलेकणी, राधाकृष्णन पिल्लई, शिव खेऱ्या, रुजुता दिवेकर, ब्रेट ली, गीता पिरामल यांसारख्या देश-विदेशातील नामवंत लेखकांनी येथे आपली पुस्तके सादर केली आहेत. त्यामुळे हे ठिकाण लेखक आणि वाचक यांच्यातील संवादाचं महत्त्वाचं केंद्र बनलं आहे.
एक्सप्रेस बुक सर्व्हिसने काळानुसार स्वतःला बदलत नवनवीन संकल्पना राबवल्या. ‘बुक्स ऑन व्हील्स’ ही संकल्पना सुरू करून पुस्तकं थेट लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कॉर्पोरेट हाऊस, शॉपिंग मॉल्समध्ये पुस्तक स्टॉल उभारून वाचनसंस्कृतीचा प्रसार केला गेला. पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलचा सह-आयोजक म्हणून तसेच लोणावळा, खंडाळा, मुंबई आणि पाचगणी येथे साहित्यिक महोत्सवांचे आयोजन करून या संस्थेने साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे.
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी रोहित जेराजानी यांनी अनेक वर्षे आझम कॅम्पसमध्ये स्पीड रीडिंग वर्ग घेतले. २०१९ मध्ये २५ हून अधिक शाळांमध्ये बाल साहित्य महोत्सवांचे आयोजन करण्यात आलं. कोविड काळातही या संस्थेने ऑनलाइन पुस्तक चर्चा आणि लेखक संवाद सुरू ठेवून वाचकांशी नातं टिकवून ठेवलं. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पुण्यात होणाऱ्या बुक टॉक्सना शंभरहून अधिक वाचक उपस्थित राहतात, हे याचं उत्तम उदाहरण आहे.
आज एक्सप्रेस बुक सर्व्हिस दरमहा नवीन पुस्तकांची ईमेल न्यूजलेटर, दररोज नव्या पुस्तकांची माहिती देणारे संदेश पाठवते. कॉपीराइट आणि पायरेसीविषयी जनजागृती करण्यासाठी रोहित जेराजानी विविध मंचांवर सक्रिय आहेत. या दीर्घ आणि समर्पित कार्याची दखल घेत २०२४ मध्ये ‘बेस्ट फॅमिली रन बिझनेस – पुणे’ आणि २०२५ मध्ये ‘बेस्ट बुक शॉप इन इंडिया’ हे मानाचे पुरस्कार या संस्थेला मिळाले आहेत. ज्ञानाची ही परंपरा भविष्यातही तितक्याच ताकदीने पुढे सुरू राहील, यात शंका नाही.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information