SSC Exam Scam: ‘नाटक’ कनेक्शनमुळे मिळाला चार्ज? अमरावती कॉपीकांडातील मोठा खुलासा
SSC Exam Scam: ‘नाटक’ कनेक्शनमुळे मिळाला चार्ज? अमरावती कॉपीकांडातील मोठा खुलासा
Amravati SSC Exam Scam: दहावीच्या कॉपीकांडात अटक झालेल्या सुधीर खोडे यांना गटशिक्षणाधिकारी पदाचा नियमबाह्य प्रभार ‘नाटक’ कनेक्शनमुळे मिळाल्याची चर्चा. सीईओ संजिता महापात्र यांच्यावर आधारित नाटकामुळे प्रकरण चर्चेत.
पुणे ०७ मार्च २०२६ : अमरावती जिल्ह्यातील दहावीच्या बोर्ड परीक्षेतील कॉपीकांड प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. अंजनगाव सुर्जी येथील या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आलेले विस्तार अधिकारी (शिक्षण) सुधीर खोडे यांना गटशिक्षणाधिकारी पदाचा नियमबाह्य प्रभार देण्यात आला होता. मात्र आता या प्रभारामागे एक धक्कादायक ‘नाटक’ कनेक्शन असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर खोडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या जीवनावर आधारित एक नाटक लिहिले होते. विशेष म्हणजे या नाटकाचे सादरीकरण २ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्वतः सीईओ संजिता महापात्र, खासदार बळवंत वानखडे आणि आमदार गजानन लवटे उपस्थित होते. त्यामुळे या नाटकाच्या पार्श्वभूमीवर खोडे यांना दिलेल्या प्रभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रशासकीय नियमांनुसार गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार त्या परिसरातील पात्र अधिकाऱ्याला देणे आवश्यक असते. मात्र अंजनगाव सुर्जी कार्यालयातच पात्र अधिकारी उपलब्ध असतानाही अमरावती येथून तब्बल ८० किलोमीटर दूर असलेल्या सुधीर खोडे यांना हा प्रभार देण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला होता.
तत्कालीन गटविकास अधिकारी किसन खातळे यांनीही या संदर्भात लेखी आक्षेप नोंदवला होता. त्यांनी अंजनगाव सुर्जी येथील विस्तार अधिकारी दिलीप धनुजी खंडारे हे या पदासाठी पात्र असल्याचे सांगत त्यांनाच प्रभार देण्याची शिफारस केली होती. मात्र ही शिफारस धुडकावून लावत खोडे यांनाच प्रभार देण्यात आला.
दरम्यान या प्रकरणात राजकीय शिफारशींचीही भूमिका असल्याचे समोर आले आहे. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांनी खोडे यांना प्रभार देण्याबाबत सीईओ महापात्र यांना पत्र दिले होते. त्यानंतर ३ मार्च २०२५ रोजी खासदार बळवंत वानखडे यांनीही अशाच प्रकारचे पत्र पाठवले होते. या दोन्ही शिफारशींनंतर ५ जून २०२५ रोजी महापात्र यांनी खोडे यांना गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्याचा आदेश जारी केला.
मात्र २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दहावीच्या इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिकांची तस्करी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आणि संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई विद्यालयाच्या कस्टडीमधून दोन उत्तरपत्रिका बाहेर काढण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. या प्रकरणात प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे, विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर, एक खासगी व्यक्ती आणि दोन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र विद्यापीठ व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम १९८२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी १ मार्च २०२६ रोजी सुधीर खोडे आणि इतर आरोपींना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
या कारवाईनंतर प्रशासनातही खळबळ उडाली. माध्यमांच्या दबावामुळे सीईओ संजिता महापात्र यांनी खोडे यांना तात्काळ निलंबित केले. मात्र सुरुवातीपासून विरोध असतानाही त्यांना प्रभार का देण्यात आला, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, स्वतःच्या जीवनावर आधारित नाटक लिहिणाऱ्या अधिकाऱ्याला ‘बक्षीस’ म्हणून हा प्रभार देण्यात आला का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक पदाचा वापर वैयक्तिक प्रतिमावर्धनासाठी केला गेला का, याची चौकशी करण्याची मागणीही काही स्तरातून होत आहे. या संपूर्ण प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, याकडे आता अमरावतीसह राज्याचे लक्ष लागले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information