The Great Indian Kapil Show: ऋषभ पंतच्या 27 कोटींवर कृष्णा अभिषेकची टोमणेबाजी, युजवेंद्र चहलला वैयक्तिक प्रश्न विचारला!
ऋषभ पंतच्या 27 कोटींवर कृष्णा अभिषेकची टोमणेबाजी, युजवेंद्र चहलला वैयक्तिक प्रश्न विचारला!
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या आगामी एपिसोडमध्ये ऋषभ पंत, युजवेंद्र चहल आणि गौतम गंभीर विनोदांनी भरलेला धमाल भाग सादर करणार. प्रोमो व्हिडीओत कृष्णा अभिषेकने पंतच्या २७ कोटींवर मारला टोमणा.
सायली मेमाणे
मुंबई ३ जुलै २०२५ : मुंबई : कपिल शर्माच्या ‘The Great Indian Kapil Show’ चा तिसरा भाग आता आणखी धमाकेदार ठरणार आहे. या भागात भारतीय क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू — ऋषभ पंत, युजवेंद्र चहल, अभिषेक शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर — हे पाहुणे म्हणून सहभागी झाले आहेत. या भागाचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात कृष्णा अभिषेकच्या मजेदार विनोदांनी सर्वांना खळखळून हसवले आहे.
या एपिसोडमध्ये क्रिकेटर्सच्या खास शैलीत मस्ती आणि गमतीजमती पाहायला मिळणार आहेत. गौतम गंभीरसारखा नेहमी शांत दिसणारा व्यक्ती सुद्धा यावेळी थोडा मोकळा झाल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. कपिल शर्माने गंभीरला विचारले, “प्रशिक्षक साहेब, आज मुलांना मजा करण्याची परवानगी आहे ना?”, त्यावर गंभीरने हसत उत्तर दिलं की “मला त्यांची परवानगी घ्यावी लागेल.”
यावेळी ऋषभ पंतने गंभीरबद्दल सांगितलं की, “जेव्हा सामना वरखाली होतो तेव्हा सगळेच तणावात येतात.” त्यावर गंभीरनेही टोला लगावत म्हटलं की, “जेव्हा शो चालत नाही तेव्हा तुमची हीच अवस्था असते.”
सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे कृष्णा अभिषेकने पंतवर मारलेला मजेशीर टोमणा. तो म्हणाला, “तू २७ कोटींना आयपीएलमध्ये विकला गेलास पण खिशात एकही रुपया नाही!” त्यावर पंतने लगेच उत्तर दिलं, “कपिल पाजी एका महिन्यात इतकं कमावतो.”
शोमध्ये सुनील ग्रोव्हरने नवज्योत सिंग सिद्धूच्या गेटअपमध्ये एन्ट्री घेतली आणि युजवेंद्र चहलला विचारलं की “आरसीबीचं कौतुक कसं करायचं?” कपिलने स्पष्ट केलं की चहल आता आरसीबीमध्ये नसून पंजाब संघात आहे. त्यावर सुनीलने मारलेला टोमणा होता, “म्हणूनच विचारतोय की आरसीबीने त्याला निवडलं नाही, मग काय कौतुक करावं?”
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असलेला शो आहे आणि पहिल्या दोन भागांनंतर तिसऱ्या भागासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. यावेळी क्रिकेटपटूंच्या उपस्थितीमुळे हास्याचा पाऊस पडणार हे नक्की.