Vasai Crime: 12 वर्षीय बांगलादेशी मुलीवर 3 महिन्यांत 200 हून अधिक अत्याचार, मानवी तस्करीचा पर्दाफाश
12 वर्षीय बांगलादेशी मुलीवर 3 महिन्यांत 200 हून अधिक अत्याचार, मानवी तस्करीचा पर्दाफाश
वसईत मानवी तस्करीतून सुटलेल्या 12 वर्षीय बांगलादेशी मुलीने तीन महिन्यांत 200 हून अधिक पुरुषांकडून अत्याचार झाल्याचा धक्कादायक खुलासा केला; हार्मोनल इंजेक्शनच्या संशयाने तपास सुरू.
सायली मेमाणे
पुणे ११ ऑगस्ट २०२५ : वसईत मानवी तस्करीचे भीषण वास्तव समोर आले आहे. 12 वर्षीय बांगलादेशी मुलीवर अवघ्या तीन महिन्यांत 200 हून अधिक पुरुषांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. ही मुलगी वसईतील नायगाव परिसरात उघडकीस आलेल्या देहव्यापार रॅकेटमधून सुटली. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने Exodus Road India Foundation आणि Harmony Foundation यांच्या मदतीने 26 जुलै रोजी तिला या जाळ्यातून मुक्त केले.
बालसुधारगृहात दिलेल्या जबाबानुसार, पीडितेला प्रथम गुजरातमधील नडियाद येथे नेण्यात आले, जिथे तीन महिन्यांच्या काळात तिच्यावर 200 हून अधिक पुरुषांनी अत्याचार केला. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचा संशय आहे की पीडित मुलीची लवकर पौगंडावस्था यावी यासाठी तिला हार्मोनल इंजेक्शन्स दिले गेले असावेत.
मानवी तस्करी, लैंगिक शोषण आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेविषयीचे गंभीर प्रश्न या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाले आहेत. सामाजिक संस्था आणि पोलिस यंत्रणा मिळून अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत असल्या, तरी अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी व्यापक पातळीवर कठोर कारवाईची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.