Vasai News : भर पावसात यलो जॅकेट माशांची दहशत; वसईच्या नाळे गावात ग्रामस्थ भयभीत
भर पावसात यलो जॅकेट माशांची दहशत; वसईच्या नाळे गावात ग्रामस्थ भयभीत
वसईतील नाळे गावात यलो जॅकेट नावाच्या आक्रमक माशांनी ग्रामस्थांना डंख मारायला सुरुवात केल्याने भीतीचं वातावरण; पालिकेच्या आरोग्य यंत्रणा हतबल.
वसई : राज्यभरात सध्या पावसाने जोर धरला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या दमट हवामानामुळे अनेक ठिकाणी रोगराई वाढली असतानाच, उत्तर वसईतील नाळे गावात यलो जॅकेट प्रजातीच्या आक्रमक माशांचा थवा आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लाखोडी परिसरातील पाटील कुटुंबाच्या भेंडीच्या झाडाजवळ माशांचा थवा पहिल्यांदा दिसून आला. सुरुवातीला ग्रामस्थांना या माशा सामान्य वाटल्या आणि दुर्लक्ष केले गेले, मात्र लवकरच या माशांनी झाडाजवळून जाणाऱ्या नागरिकांना डंख मारायला सुरुवात केली. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून या माशांचा त्रास वाढत चालल्याने पालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडे मदत मागण्यात आली.
पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली मात्र, या माशांवर उपाय करण्यासाठी कोणतेही औषध अथवा यंत्रणा उपलब्ध नसल्याचे सांगत ते माघारी गेले. यानंतर ग्रामस्थांनी सह्याद्री हनीचे संचालक संजीव नाईक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी निदान करत या माशांची ओळख यलो जॅकेट हॉर्नेट म्हणून केली असून, त्या अतिशय आक्रमक आणि मांसाहारी आहेत असे सांगितले.
या माशांपासून सुरक्षित राहण्यासाठी संरक्षित कपडे घालून द्रव नायट्रोजन व पेट्रोलचा वापर करणे आवश्यक असल्याचे नाईक यांनी सूचित केले आहे. मात्र सध्या ते वसईबाहेर असल्यामुळे प्रत्यक्ष उपाय येत्या काही दिवसांमध्येच शक्य होणार आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाला आणि स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनाही या प्रकारच्या माशांबाबत कोणतेही प्रशिक्षण दिले नसल्याने यंत्रणा पूर्णतः हतबल झाली आहे.
या पावसाळी हवामानात अशा प्रकारच्या कीटकांचा उपद्रव केवळ वसईपुरता मर्यादित न राहता इतर ठिकाणीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि अशा माशांच्या संपर्कात येणे टाळावे, अशी विनंती स्थानिक तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.