Vasai Traffic Jam: 70 KM प्रवासासाठी शेकडो विद्यार्थी 12 तास वाहतूक कोंडीत अडकले
Vasai Traffic Jam: 70 KM प्रवासासाठी शेकडो विद्यार्थी 12 तास वाहतूक कोंडीत अडकले
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे दादरमधील शाळेतील शेकडो विद्यार्थी 12 तास बसमध्ये अडकले. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली.
सायली मेमाणे
पुणे १५ ऑक्टोबर २०२५ : वसई – मुंबईतील वाहतूक कोंडीची जीवघेणी अवस्था
मुंबई आणि उपनगरातील वाहतूक दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली, ज्यामुळे शेकडो शाळकरी विद्यार्थी तब्बल 12 तास वाहतूक कोंडीत अडकले.
दादर येथील एका नामांकित शाळेतील विद्यार्थी सहा बस आणि मालवणी परिसरातील विद्यार्थी सहा बस या तब्बल 12 बसमध्ये अडकले. विद्यार्थी वज्रेश्वरी येथील द ग्रेट एक्सेप वॉटर पार्कमध्ये पिकनिकसाठी गेले होते. दादर ते द ग्रेट एस्केप वॉटर पार्कचे अंतर केवळ 70 किलोमीटर असून, साधारण प्रवासासाठी 1.5 ते 3 तास लागतात. मात्र, संध्याकाळी 4.30 वाजता पिकनिक संपून निघालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवसाची पहाट लागली आणि सकाळी 6 वाजता दादरला पोहोचले.
कारणे आणि अपयशी वाहतूक नियोजन
ठाणे-घोडबंदर महामार्गावर चालू असलेल्या दुरुस्ती कामांमुळे अवजड वाहनांना बंदी घातली आहे. परंतु, संध्याकाळच्या वेळेत या बंदीमुळे साध्या प्रवाशांवर प्रचंड परिणाम झाला. वाहतूक नियोजन ढिसाळ असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या 12 बस वाहतूक कोंडीत अडकल्या. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, संपूर्ण रात्री MBVV वाहतूक पोलीस घटनास्थळी दिसले नाहीत.
विद्यार्थ्यांची अडचण आणि मदत
रात्रभर विद्यार्थी अन्न-पाण्याविना बसमध्ये अडकले. तहान, भूक आणि थकव्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल पाहण्यासारखे होते. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना पाणी, बिस्किट आणि आवश्यक मदत उपलब्ध करून दिली तसेच वाहतूक कोंडीतून बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
स्थानिक प्रशासनाचा अभाव
या जीवघेणी वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ठाणे-घोडबंदर महामार्गावरील दुरुस्ती कामांमुळे निर्माण झालेल्या या अडचणींचा फटका साध्या प्रवाशांना बसतो, तर प्रशासनाचा हात अजूनही उघड आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहून, वाहतूक पोलीस किंवा संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची व्यवस्था अपेक्षित होती.
मुंबई-उपनगरातील वाहतूक व्यवस्थेत गंभीर सुधारणा करण्याची तातडी आहे. तरुण आणि शाळकरी विद्यार्थ्यांवर प्रचंड फटका बसला आहे. स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलीस यांनी यापुढे अशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली मदत प्रशंसनीय आहे, परंतु प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी.