Viral Video: मराठीचा आग्रह धरणाऱ्या महिलेची नोकरी गेली; माही खानविरुद्ध मनसे आक्रमक, अविनाश जाधवांचा इशारा
मराठीचा आग्रह धरणाऱ्या महिलेची नोकरी गेली; माही खानविरुद्ध मनसे आक्रमक, अविनाश जाधवांचा इशारा
एअर इंडियाच्या विमानातील वादानंतर युट्युबर माही खान आणि मराठी बोलणाऱ्या महिलेतील प्रकरण तंग झालं आहे. मराठीचा आग्रह धरणाऱ्या महिलेची नोकरी गेल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी माही खानला कोंबडा बनवण्याची शपथ घेतली आहे.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑक्टोबर २०२५ : एअर इंडियाच्या विमानामध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये युट्युबर माही खान आणि एका महिलेतील मराठी भाषेवरून वाद झाल्याचे दिसून येते. मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या या महिलेने फक्त माही खानला “भाऊ, जरा हळू” असं म्हटलं, पण त्यावरून उडालेल्या वादाने प्रकरण आता गंभीर वळण घेतलं आहे.
या व्हिडिओनंतर महिलेवर सोशल मीडियावर ट्रोलिंगचा भडका उडाला. अनेकांनी तिच्यावर टीका केली, काहींनी शिवीगाळ तर काहींनी धमक्या दिल्या. या सर्व घटनांनंतर त्या महिलेची खरी ओळख समोर आली आणि ती मूळची बंगाली असल्याचं समजलं. बंगाली असूनही मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या या महिलेनं मराठी बोलल्यामुळे तिला अशा प्रकारे लक्ष्य केलं गेलं, ही बाब सर्वत्र संतापाचा विषय ठरली आहे.
मुग्धा मजुमदार असे या पीडित महिलेचे नाव आहे. त्या ह्युंडाय कंपनीत काम करत होत्या. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि ट्रोलिंग वाढल्यानंतर त्यांना नोकरी सोडावी लागली. त्या सांगतात की, “माझं करिअर संपवलं गेलं, मला धमक्या दिल्या जात आहेत, आणि मी फक्त मराठीत बोलले म्हणून आज माझी नोकरी गेली.”
मुग्धा मजुमदार यांनी सांगितले की, त्या विमानात चहा पीत असताना माही खानने सीटचं बॅकरेस्ट अचानक मागे घेतलं. त्यामुळे त्यांच्या हातातलं जेवण अंगावर सांडलं. त्यांनी फक्त ‘भाऊ जरा हळू’ असं सांगितलं, मात्र माही खानला त्याचा राग आला आणि त्याने त्यांच्याशी वाद सुरू केला. त्या म्हणतात की, “मी तो व्हिडिओ बनवला नव्हता, पण माही खानने तो व्हिडिओ पोस्ट करून माझ्या प्रतिष्ठेवर डाग आणला.”
या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी या महिलेची भेट घेतली. जाधव यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की, “माही खान YouTube वर व्ह्यूज वाढवण्यासाठी हे सगळं करतोय. आम्ही त्याला सोडणार नाही. तो मराठी बोलणारच — हा माझा शब्द आहे.”
त्यांनी सर्व मराठी भाषाप्रेमींना आवाहन केलं की, माही खानच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आणि युट्युब चॅनेलला रिपोर्ट करा. “माही खानला आम्ही शोधून काढून मनसेच्या कार्यालयात कोंबडा बनवून बसवलं नाही, तर माझं नाव अविनाश जाधव नाही,” असे जाहीर वक्तव्य त्यांनी केलं.
दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्रात आणि सोशल मीडियावर ‘मराठी अभिमान’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेकांनी माही खानच्या वर्तनाचा निषेध केला असून, मराठीचा आग्रह धरणाऱ्या महिलेच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.
या संपूर्ण घटनेने केवळ भाषेचा नव्हे तर प्रतिष्ठेचा प्रश्न उभा राहिला आहे. मराठी बोलल्यामुळे त्रास सहन करावा लागणं ही बाब महाराष्ट्रातील जनतेला अस्वस्थ करणारी ठरली आहे. सध्या ही प्रकरण पोलिसांच्या नजरेत असून, माही खान आणि त्याच्या व्हिडिओंवर सोशल मीडियावर मोठा विरोध व्यक्त होत आहे.