YouTube Monetization Update 2025: युट्यूब AI व्हिडीओंवर मॉनेटायझेशन थांबवणार! ओरिजिनल क्रिएटर्सना मिळणार फायदा
युट्यूब AI व्हिडीओंवर मॉनेटायझेशन थांबवणार!
युट्यूबने AI आणि कॉपी कंटेंटवर मोठा निर्णय घेतला असून 15 जुलै 2025 पासून अशा व्हिडीओंवर कमाई थांबवली जाणार आहे. ओरिजिनल आणि स्वतःच्या आवाजात तयार केलेल्या व्हिडीओंना प्राधान्य दिलं जाणार.
सायली मेमाणे
पुणे ११ जुलै २०२५ : YouTube ने त्यांच्या मॉनेटायझेशन पॉलिसीत मोठा बदल करत 15 जुलै 2025 पासून AI च्या मदतीने तयार केलेल्या व्हिडीओंवरील कमाई थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल युट्यूबवरील ओरिजिनल कंटेंटला चालना देण्यासाठी उचलण्यात आलं असून, कॉपी कंटेंट किंवा कमी मेहनत घेऊन AI टूल्सने तयार केलेले व्हिडीओ यापुढे कमाईसाठी पात्र राहणार नाहीत. यामुळे बऱ्याच मोठ्या युट्यूबर्सना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
YouTube वर आज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. त्यात अनेक व्हिडीओ हे स्वतःच्या कल्पनाशक्तीने आणि मेहनतीने तयार केलेले असतात. मात्र याच वेळी काही क्रिएटर्स AI प्लॅटफॉर्मचा वापर करून काही मिनिटांत व्हिडीओ तयार करतात आणि त्यातून पैसे कमावतात. अशा प्रकारे तयार केलेल्या कंटेंटमुळे खरी मेहनत करणाऱ्या क्रिएटर्सवर अन्याय होतो. त्यामुळे YouTube ने आता AI Generated किंवा कॉपी कंटेंटवर कारवाई करत अशा व्हिडीओंना मोनेटायझेशनपासून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
YouTube च्या नव्या धोरणांनुसार केवळ तेव्हाच कमाई मिळणार आहे, जेव्हा व्हिडीओ ओरिजिनल असेल, तो व्हिडीओ स्वतः तयार केलेला असेल, त्यात क्रिएटरचा खरा आवाज असेल आणि व्हिडीओमध्ये त्याची कल्पकता, मेहनत स्पष्ट दिसून येईल. या धोरणामुळे असेही ठरवण्यात आले आहे की, व्हॉइसओव्हर किंवा डब केलेले कंटेंट देखील तपासले जातील आणि त्यामध्ये मानवी आवाज नसल्यास कमाई नाकारली जाईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बदलामुळे युट्यूबवरील विश्वासार्हता आणि व्हिडीओची गुणवत्ता वाढेल. युजर्सना अधिक चांगला आणि सत्य माहिती असलेला कंटेंट पाहायला मिळेल. त्याचबरोबर बनावट, दिशाभूल करणाऱ्या किंवा फसव्या व्हिडीओंची संख्या कमी होईल.
या नव्या नियमांमुळे मोठ्या AI-आधारित चॅनल्सवर आर्थिक परिणाम होणार असून त्यांनी आता आपली कंटेंट स्ट्रॅटेजी बदलावी लागणार आहे. अनेक लहान युट्यूबर्स ज्यांनी AI च्या सहाय्याने सुरुवात केली होती, त्यांना ओरिजिनल कंटेंट बनवणं थोडं कठीण जाणार आहे. मात्र यामुळे मेहनत करणाऱ्या क्रिएटर्सना प्रोत्साहन मिळेल आणि दर्जेदार व्हिडीओ बनवण्याकडे कल वाढेल. अशा प्रकारे, YouTube ने डिजिटल कंटेंटचा दर्जा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक पाऊल उचललं आहे.