ZP Election 2026: जिवंत मुलीला मृत दाखवल्याचा आरोप; सातारा ZP निवडणुकीत भाजप उमेदवार वादात
ZP Election 2026: जिवंत मुलीला मृत दाखवल्याचा आरोप; सातारा ZP निवडणुकीत भाजप उमेदवार वादात
Satara ZP Election 2026 मध्ये भाजप उमेदवारावर जिवंत मुलीला मृत दाखवल्याचा गंभीर आरोप. मंत्री जयकुमार गोरे व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर दबाव टाकल्याचा संशय, प्रकरण हायकोर्टात.
पुणे 2५ जानेवारी २०२६ : महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने निवडणुकीच्या अटी पूर्ण करण्यासाठी जिवंत मुलीला मृत दाखवल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
कराड तालुक्यातील सैदापूर गटातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत असलेल्या सागर भीमराव शिवदास यांच्यावर अपक्ष उमेदवार नरहरी जानराव यांनी आक्षेप घेतला आहे. सागर शिवदास यांना तीन अपत्ये असल्याचा दावा करत, त्यातील एकही मुलगी मृत नसताना निवडणूक कागदपत्रांमध्ये एका मुलीचा मृत्यू दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी लागू असलेल्या अपत्य अटींचा भंग झाल्याचा मुद्दा उपस्थित करत हा आक्षेप नोंदवण्यात आला होता.
या प्रकरणाची सुनावणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर झाली. सकाळच्या सत्रामध्ये भाजप उमेदवाराच्या वकिलाने, उमेदवारी अपात्र ठरल्यास पक्ष दुसरा उमेदवार देईल, असे स्पष्टपणे सांगितल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. मात्र, याच प्रकरणाची सायंकाळच्या सत्रात झालेल्या सुनावणीत अचानक दुसऱ्या अपत्याचा मृत्यू झाल्याचा दावा सादर करण्यात आल्याने संशय अधिकच बळावला आहे. ज्या मुलीला मृत दाखवण्यात आले, ती प्रत्यक्षात जिवंत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निपक्षपाती भूमिका घेतली नसल्याचा आरोप अपक्ष उमेदवार आणि त्यांच्या वकिलांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, या निकालामध्ये थेट राजकीय हस्तक्षेप झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. भाजपचे ग्रामविकास मंत्री तसेच साताऱ्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनावर दबाव टाकून निकाल फिरवल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे.
या प्रकरणामुळे केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, विरोधकांकडून या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, तक्रारदारांनी न्याय मिळावा यासाठी कोल्हापूर सर्किट बेंचकडे धाव घेतली असून, येत्या 27 तारखेला मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले असून, या निकालाचा जिल्हा परिषद निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक काळात अशा प्रकारचे गंभीर आरोप समोर आल्याने लोकशाही प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणूक आता केवळ राजकीय लढाई न राहता, कायदेशीर आणि नैतिक प्रश्नांचे रणांगण बनली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information