अहिल्यानगरात दुर्दैवी दुर्घटना! आईच्या डोळ्यांसमोर दगडखाणीत पाण्यात बुडून भाऊ-बहिणीचा मृत्यू
अहिल्यानगरात दुर्दैवी दुर्घटना! आईच्या डोळ्यांसमोर दगडखाणीत पाण्यात बुडून भाऊ-बहिणीचा मृत्यू
अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात दगडखाणीत साठलेल्या पाण्यात बुडून सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू. मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाय घसरून मृत्यू; परिसरात शोककळा.
सायली मेमाणे
१६ नोव्हेंबर २०२५ : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. चांदेकसारे शिवारातील दगडाच्या खाणीत साठलेल्या पाण्यात बुडून सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी, 15 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आईसमोरच झालेल्या या भयानक प्रसंगामुळे वाढे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मृत मुलांची नावे सार्थक गणपत बढे (वय 19) आणि सुरेखा गणपत बढे (वय 18) अशी आहेत. हे दोघेही कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथील रहिवासी होते.
एका साध्या दैनंदिन कामाचे रूपांतर अशा भयावह दुर्घटनेत होईल, याची कल्पनाही वाढे कुटुंबाला नव्हती. आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी दोन्ही मुले चांदेकसारे शिवारातील दगडाच्या खाणीत आली होती. खाणीत पावसाचे पाणी साठलेले होते. आई मेंढ्या धुण्याचे काम करत असताना दोन्ही भाऊ-बहिण तिची मदत करत होते. पाण्याच्या काठावर उभे असताना दोघांचेही पाय घसरले आणि ते थेट खोल पाण्यात पडले. ही घटना क्षणात घडल्याने आई काही समजून घेण्याच्या आतच मुलं पाण्यात बुडाली.
आईने घाबरून मदतीसाठी मोठ्याने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, पण त्यावेळी खूप उशीर झाला होता. पाण्यात पडलेल्या दोघांना बाहेर काढण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या हादरवून टाकणाऱ्या दृश्याने आईसह गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे. एकाच वेळी दोन तरुण जीव गमावल्याने परिसरात दु:खाचे सावट पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठले. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. दगडखाणीत उभे पाणी किती धोकादायक ठरू शकते याची ही घटना अतिशय वेदनादायी जाणीव करून देते. अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेद्वारे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. पुढील तपास कोपरगाव तालुका पोलिसांकडून सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे वाढे कुटुंबावर दु:खाचा पर्वत कोसळला आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली असून या घटनेने सर्वच नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. पावसाचे पाणी साठलेल्या खाणीत किंवा ओढ्यांत जाणे किती धोकादायक ठरू शकते याविषयी सावधगिरीचा इशारा देत अनेकांनी प्रशासनाने अशा ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. एका क्षणात दोन तरुणांचे आयुष्य संपवणारी ही दुर्घटना कोपरगाव तालुक्यासाठी कायमची वेदनादायी आठवण बनली आहे.