कल्याणमध्ये डेंग्यूचा उद्रेक, ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मनसेचा प्रशासनावर हल्लाबोल

0
कल्याणमध्ये डेंग्यूची साथ; ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, ३५ रुग्ण आढळले, मनसेचा प्रशासनावर हल्लाबोल

कल्याणमध्ये डेंग्यूची साथ; ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, ३५ रुग्ण आढळले, मनसेचा प्रशासनावर हल्लाबोल

कल्याण-डोंबिवलीत डेंग्यूने घेतला तरुणाचा बळी; आतापर्यंत ३५ रुग्णांची नोंद. मनसेने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेवर निशाणा साधला. नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण.

सायली मेमाणे

कल्याण-११ जुलै २०२५ : कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डेंग्यूने डोके वर काढले आहे. मागील दोन महिन्यांत कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) हद्दीत डेंग्यूचे तब्बल ३५ रुग्ण नोंदवले गेले आहेत. या साथीत आता ३१ वर्षीय विलास म्हात्रे या तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे मनसेने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर कडक टीका करत निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विलास म्हात्रे बेतुकरपाडा, कल्याण येथे राहत होता. ७ जुलै रोजी त्याला तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर त्याला डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला आहे.

या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेच्या आरोग्य विभागावर जोरदार हल्ला चढवला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर प्रतीकात्मक आंदोलन करत ‘इडा पिडा टळो’ अशा घोषणा देत नारळ फोडला. त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळतेचा निषेध नोंदवत तातडीने कारवाईची मागणी केली.

मनसेने असा आरोप केला की, शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असताना केडीएमसीचा आरोग्य विभाग काहीच ठोस उपाययोजना करत नाही. परिसरात साचलेले पाणी, नाली साफसफाईचा अभाव, डासांचे वाढते प्रमाण या सर्व बाबींमुळे डेंग्यूचा फैलाव झपाट्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर त्वरित फॉगिंग, औषध फवारणी आणि जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकारामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण असून, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केडीएमसीने या संकटाचा गांभीर्याने विचार करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक ठरत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed