गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २ दरवाजे पूर्ण उघडले; वैनगंगा नदीत १.४१ लाख क्युसेक विसर्ग
गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २ दरवाजे पूर्ण उघडले; वैनगंगा नदीत १.४१ लाख क्युसेक विसर्ग
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून अतिवृष्टीमुळे १.४१ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे ३३ पैकी २ दरवाजे पूर्ण १ मीटरने व ३१ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. नदीपात्रातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सायली मेमाणे
पुणे २१ ऑगस्ट २०२५ :भंडारा | सततच्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले असून त्यापैकी २ दरवाजे १ मीटरने तर उर्वरित ३१ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत.
या माध्यमातून १ लाख ४१ हजार ८५९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून सोडलेले पाणी थेट वैनगंगा नदी पात्रात जात असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात अनावश्यक वावरणे टाळावे, तसेच नदीजवळील शेतकरी व मच्छीमारांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोसेखुर्द धरण हे विदर्भातील सर्वात मोठे धरण असून, त्यातून होणाऱ्या विसर्गामुळे गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना पूरस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.