छत्रपती संभाजीनगरात मंदिरासमोर भीषण अपघात; ब्रेकऐवजी एक्स्लरेटर दाबल्याने १ मृत्यू, ५ जखमी
छत्रपती संभाजीनगरातील काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात
छत्रपती संभाजीनगरातील काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात; स्विफ्ट डिझायर कारने पादचाऱ्यांना उडवले. एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी, चालक अटकेत.
सायली मेमाणे
छत्रपती संभाजीनगर ५ जुलै २०२५ : छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती मंदिरासमोर शुक्रवारी (दि. 4 जुलै) सकाळी सव्वा आठच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. स्विफ्ट डिझायर कारने रस्त्यावरील पादचाऱ्यांना उडवत थेट मंदिराच्या पायऱ्यांवर धडक दिली. या अपघातात मंदिरात सेवा बजावत असलेले सुरक्षारक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे (वय 70) यांचा जागीच मृत्यू झाला.
या भीषण अपघातात दिगंबर तौर (45), मनिषा समधाने (40), विकास समधाने (50), रवींद्र चौबे (65) आणि श्रीकांत राडेकर (60) हे पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एमजीएम, ईएसआयसी व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर तातडीने धाव घेऊन मदतकार्य करणाऱ्या स्थानिक नागरिकांमुळे अनेकांना वेळेवर रुग्णालयात हलवता आले.
अपघाताची प्राथमिक चौकशी केल्यानंतर, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक प्रशांत एकनाथ मगर (30, रा. सिडको) याने चुकून ब्रेकऐवजी एक्स्लरेटर दाबल्याने ही दुर्घटना घडली. प्रशांत मगर हा उस्मानपुरा भागात खासगी शिकवणी घेतो आणि तो सकाळी गारखेडा क्रीडा संकुलात टेनिस खेळून घरी परतत असताना पिरॅमिड चौकातून जात होता. तेव्हा समोरून येणाऱ्या कारकडे लक्ष गेल्यामुळे घाबरलेल्या प्रशांतने ब्रेकऐवजी चुकून एक्स्लरेटर दाबल्याचे त्याने कबूल केले आहे.
अपघातात वापरलेली कार ही २२ मे रोजी नव्याने घेतलेली ऑटोमॅटिक कार असून, कार चालवण्याचा पुरेसा सराव नसल्यामुळे वाहनावर नियंत्रण गमावले गेले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले की, आरोपी चालक प्रशांत मागील काही दिवसांपासून भरधाव वेगाने कार चालवत असल्याच्या तक्रारी होत्या.
दरम्यान, अपघातस्थळी उपचारासाठी आलेले एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर पवार यांनी या थरारक घटनेचा अनुभव सांगितला. पोलीसांनी आरोपी प्रशांत मगरला अटक केली असून, त्याच्या ताब्यातील कार देखील जप्त करण्यात आली आहे. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.