जुन्नर कोकणकड्यावर आढळले दोन मृतदेह; तलाठी पारधी व रुपाली प्रकरणाचा गुंता गहिरा, पोलिस तपास सुरू

0
जुन्नर कोकणकड्यावर आढळले दोन मृतदेह

जुन्नर कोकणकड्यावर आढळले दोन मृतदेह

जुन्नर कोकणकड्यावर श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी व रुपाली खुटाण यांचे मृतदेह आढळले. आत्महत्या की काही गूढ? सुसाइड नोटमधून चौकशीचे दरवाजे खुले.

सायली मेमाणे

२५ जून २०२५ : जुन्नर तालुक्यातील दुर्गवाडी कोकणकड्यावरून सुमारे 1300 फूट उंच दरीत पडलेले दोन मृतदेह जुन्नर पोलिस व रेस्क्यू टीमच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आले आहेत. हे मृतदेह श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी (वय 40) आणि रुपाली खुटाण (वय 17) यांचे असल्याचे ओळख पटली असून, दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

रविवार, 22 जून रोजी या दोघांचे मृतदेह आढळून आले होते. घटनेनंतर कोकणकड्यावर धुके व मुसळधार पावसामुळे पोलिसांना शोधकार्यात अडचणी आल्या. मात्र, सोमवार 23 जून रोजी सकाळपासून सुरू झालेल्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले. रूपालीचा मृतदेह 1200 फूट खाली आणि पारधी यांचा मृतदेह 1350 फूट खोल दरीत सापडला होता. मृतदेह बाहेर काढण्यासाठी जुन्नर रेस्क्यू टीमने मोठ्या धैर्याने कार्य केले.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मृत पारधी यांची पांढरी रंगाची कार कोकणकड्यावर कुलूपबंद स्थितीत आढळली. ती जुन्नर पोलिसांनी टोईंग करून पोलीस ठाण्यात आणली आहे. गाडीचा तपास सुरू असून, यामध्ये महत्वाचे धागेदोरे मिळू शकतात, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, दोघांचेही नातेवाईक सध्या चौकशीसाठी बोलावण्यात आले असून, त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात येत आहे.

घटनास्थळी पारधी व रुपाली यांच्या स्वतंत्र सुसाइड नोट पोलिसांना सापडल्या आहेत. रामचंद्र पारधी यांनी त्यांच्या पत्रात पत्नी व तिच्या नातेवाईकांकडून मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख केला आहे आणि त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तसेच आई-वडील आणि भावाची माफी मागितली आहे. दुसरीकडे, रुपाली खुटाणने आपल्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आई-वडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आयुष्य संपवत असल्याचा उल्लेख केला आहे.

या आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे, हे स्पष्ट होण्यास अजून काही वेळ लागेल, मात्र सध्या ही घटना प्रेमसंबंध, कौटुंबिक दबाव आणि सामाजिक परिस्थिती यांचा गुंता असल्याचे संकेत मिळत आहेत. पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले की, पुढील काही दिवसांत या प्रकरणातील सर्व बाजू उलगडतील. आत्महत्येच्या पाठीमागे काही अन्य व्यक्ती जबाबदार असतील, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रीगोंदा येथील तलाठी असलेल्या पारधी यांच्यावरील कौटुंबिक तणाव व रुपालीच्या अल्पवयीन स्थितीमुळे या प्रकरणात कायदेशीर अडचणीही उपस्थित होऊ शकतात. या घटनेने समाजात चर्चेला उधाण आले असून, वयातील फरक, मानसिक आरोग्य, प्रेमसंबंध आणि कौटुंबिक अपेक्षांवरील दडपण यासारख्या गंभीर विषयांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *