झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) संस्थापक नेते शिबू सोरेन यांचे निधन झाले आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; देशभरातून शोक व्यक्त
सायली मेमाणे
पुणे ५ ऑगस्ट २०२५ : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) संस्थापक नेते शिबू सोरेन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे झारखंड राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. शिबू सोरेन यांना ‘गुरुजी’ म्हणून ओळखले जात असे आणि त्यांनी आदिवासी हक्कांसाठी लढा दिला होता. त्यांच्या नेतृत्वात झारखंडी अस्मितेला दिशा मिळाली होती आणि त्यांनी अनेक दशकांपासून झारखंडच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे शिबू सोरेन यांचे पुत्र असून त्यांनी वडिलांच्या निधनानंतर भावनिक संदेश जारी केला आहे. अनेक वरिष्ठ नेते, माजी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.
शिबू सोरेन यांनी तीन वेळा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. तसेच केंद्रात मंत्रीपदही त्यांनी भूषवले होते. त्यांनी सामाजिक न्याय, आदिवासी हक्क, जमीनसुधार यासारख्या अनेक प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेतली होती. त्यांच्या निधनामुळे झारखंडच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पार्थिवावर झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून राज्यात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. झारखंड विधानसभा आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
आज त्यांचे जाणे ही केवळ एका नेत्याचे निधन नसून आदिवासी समाजाचा एक आधारवड हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून झारखंडमध्ये विविध ठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येत आहे.