नितीन गडकरींच्या विमानाचं गया येथे इमर्जन्सी लँडिंग, खराब हवामानामुळे घेतला निर्णय

0
नितीन गडकरींच्या विमानाचं गया येथे इमर्जन्सी लँडिंग

नितीन गडकरींच्या विमानाचं गया येथे इमर्जन्सी लँडिंग

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विमानाचं खराब हवामानामुळे गया (बिहार) येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. वैमानिकाने खबरदारीचा उपाय म्हणून घेतला निर्णय; गडकरी सुरक्षित, पुढील प्रवासासाठी विशेष विमानाची व्यवस्था.

सायली मेमाणे

बिहार गया ४ जुलै २०२५ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विमानाचं गुरुवारी संध्याकाळी बिहारमधील गया विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. रांचीसाठी रवाना झालेलं हे विमान अचानक हवामानात झालेल्या मोठ्या बदलामुळे उतरवण्याचा निर्णय वैमानिकाने घेतला. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या घटनेमुळे पुन्हा एकदा भारतातील विमान सुरक्षेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत झालं आहे.

गेल्या काही दिवसांत देशात अनेक विमान अपघातांच्या, तांत्रिक बिघाडांच्या आणि इमर्जन्सी लँडिंगच्या घटना घडत आहेत. अहमदाबाद विमान अपघातात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर हवाई प्रवासातील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता गडकरींच्या विमानाशी संबंधित ही घटना नवीन भर घालते. मिळालेल्या माहितीनुसार, गडकरी हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी रांचीला जात होते. परंतु प्रवासादरम्यान आकाशात घनदाट ढग आणि मुसळधार पाऊस सुरू झाल्याने दृश्यता पूर्णतः कमी झाली. त्यामुळे पायलटने दक्षतेचा उपाय म्हणून गया विमानतळावर लँडिंग केलं.

गया विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, इमर्जन्सी लँडिंगसंदर्भातील अलर्ट ३० मिनिटे आधीच मिळाल्याने सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या होत्या. अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि वैमानिक यांच्याकडून योग्य नियोजन करण्यात आलं होतं. विमानतळ संचालक बंगजित साह यांनी सांगितलं की, गडकरी यांच्यासाठी व्हीआयपी प्रतीक्षालयात आरामाची सोय करण्यात आली. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर त्यांच्यासाठी रांचीहून एक विशेष विमान मागवण्यात आलं आणि त्यांनी त्या विमानातून रांचीसाठी पुढील प्रवास सुरू केला.

या घटनेतील एक सकारात्मक बाब म्हणजे सतर्क प्रशासन आणि पायलटच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. गडकरी सुरक्षित आहेत, अशी माहितीही अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. गेल्या काही काळात भारतात हवाई अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे हवाई सुरक्षेचा दर्जा, तांत्रिक देखभाल आणि आपत्कालीन उपाययोजना या बाबतीत अधिक दक्षता घेणं आवश्यक असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed