पंतप्रधान मोदींवर आचारसंहितेच्या उल्लंघनाची कारवाई नाही, पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
पंतप्रधान मोदींवर आचारसंहितेच्या उल्लंघनाची कारवाई नाही, पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
पंतप्रधान मोदींनी 2020 मध्ये आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप असूनही राज्य निवडणूक आयोगाने कारवाई टाळल्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप. याप्रकरणी ते उच्च न्यायालयात दाद मागणार.
सायली मेमाणे
पुणे ३१ जुलै २०२५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप असूनही या प्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या मुद्द्यावरून त्यांनी राज्य निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चव्हाण म्हणाले की, आयोगाने आचारसंहितेचा भंग झाल्याचे मान्य करत रेल्वे प्रशासनाला केवळ समज दिली, मात्र प्रत्यक्षात मोदींविरोधात कोणतीही शिस्तभंगात्मक कारवाई केली नाही.
इतिहासात पाहिल्यास, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत कठोर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे, कायद्याच्या दृष्टीने कोणीही मोठे नसल्याचे अधोरेखित होत असताना पंतप्रधान मोदींवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.
या पार्श्वभूमीवर, ते उच्च न्यायालयात यासंबंधी दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणावर न्यायालयीन निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारा ठरू शकतो. देशातील लोकशाही व्यवस्थेवर विश्वास टिकवून ठेवण्यासाठी नियम सर्वांना सारखे असणे आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
या विषयावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यापुढील टप्प्यावर न्यायालय आणि आयोग काय भूमिका घेते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.