पालघर : विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास, तराफ्यावरून नदी ओलांडून शाळेत
पालघर : विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास, तराफ्यावरून नदी ओलांडून शाळेत
पालघरच्या रायकरपाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी दररोज वैतरणा नदीतून तराफ्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शिक्षण हक्काच्या घोषणा फोल ठरताना दिसत असून, मोठ्या साकवाची मागणी जोर धरतेय.
सायली मेमाणे
पुणे ४ जुलै २०२५ : पालघर : विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास – रायकरपाड्यातील विद्यार्थी दररोज तराफ्यावरून नदी ओलांडून शाळेत
पालघर जिल्ह्यातील रायकरपाडा येथील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सोनाळे खुर्द गावातील हे विद्यार्थी वैतरणा नदीत पुराच्या काळात प्लास्टिक पाईपने बनवलेल्या तराफ्यावरून शाळेत जातात. ‘शिक्षणाचा हक्क’, ‘सर्व शिक्षा अभियान’ आणि ‘सारे शिकूया, पुढे जाऊया’ यासारख्या घोषणा केवळ कागदावरच शिल्लक राहिल्या आहेत, अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे.
सोनाळे गावातील सुमारे २० कुटुंबे नदीच्या पलीकडे बेटासारख्या भागात राहतात. त्यांच्यासाठी दाढरे गावात जाण्यास रस्ता असला, तरी त्यावर असलेला लहान साकव पावसात बंद होतो. त्यामुळे दररोज जवळपास १५ विद्यार्थी सोनाळे व कापरी गावांतून शाळेत जातात. उन्हाळा किंवा हिवाळा असो, विद्यार्थी पायाने नदी ओलांडतात; मात्र पावसाळ्यात तेच मार्ग जीवघेणा ठरतो.
पावसाळ्यात नदीला पूर येतो, तेव्हा विद्यार्थ्यांना एकमेकांना जोडलेल्या प्लास्टिकच्या पाईप्सपासून बनवलेल्या तराफ्यावरून शाळेत जावे लागते. तिसरीपासून दहावीपर्यंतचे विद्यार्थी या मार्गाने प्रवास करतात. ही धोकादायक यात्रा किती दिवस चालणार, असा प्रश्न पालक विचारत आहेत. काही वर्षांपूर्वी एका संस्थेने बोट दिली होती, पण ती आज खराब अवस्थेत असल्याचे स्थानिक सांगतात. आजारी रुग्णांनाही रुग्णालयात नेण्यासाठी तराफ्यावरच विसंबून राहावे लागते. नोकरी-धंद्यासाठी बाहेर जाणाऱ्यांनाही याच मार्गाने प्रवास करावा लागतो.
मोठ्या साकवाची गरज
सध्या दाढरे ते शेला मार्गावर लहान साकव आहे. जर येथे मोठा साकव उभारण्यात आला तर संपूर्ण भागासाठी दळणवळण सुलभ होईल, असे ग्रामस्थ सांगतात. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः लहान बंधाऱ्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे त्यांचा शालेय प्रवास सुरक्षित होऊ शकेल.