पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू – पीएम मोदींकडून हिरवा कंदील, जलद व आरामदायी प्रवासाची नवी सुविधा
पुणे आणि नागपूर दरम्यानचा प्रवास आता अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला. ही हाय-स्पीड ट्रेन प्रवासाचा वेळ कमी करून व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवेल.
सायली मेमाणे
पुणे ११ ऑगस्ट २०२५ : पुणे आणि नागपूर दरम्यानचा प्रवास आता अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती होती. अत्याधुनिक डिझाइन, हाय-स्पीड क्षमता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज असलेली ही ट्रेन प्रवाशांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देईल.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, वंदे भारत एक्सप्रेसमुळे पुणे-नागपूर प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे दोन्ही शहरांमधील व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक वेगाने आणि सोप्या पद्धतीने होईल. उद्घाटनावेळी रेल्वे स्थानकावर चिमुकल्यांचा आणि प्रवाशांचा उत्साह पाहायला मिळाला.
पंतप्रधान मोदींनी बेंगळुरू येथून एकाच दिवशी तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखवला. यामध्ये बेंगळुरू- बेळगाव, अमृतसर- श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि नागपूर- पुणे या मार्गांचा समावेश आहे. या सर्व गाड्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवतील आणि प्रवाशांना अधिक सुलभ व वेगवान सेवा देतील.
या उपक्रमासोबतच पंतप्रधान मोदींनी बेंगळुरू मेट्रो फेज-२ अंतर्गत यलो लाईनचे उद्घाटन केले आणि फेज-३ चा पायाभरणी कार्यक्रम सुद्धा पार पडला. मेट्रोच्या या विस्तारामुळे शहरातील प्रवासी सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे.