पुणे विद्यापीठात कॅरी ऑन प्रश्नावरून विद्यार्थ्यांचा आक्रोश; कुलगुरूंविरोधात घोषणाबाजी
पुणे विद्यापीठात कॅरी ऑन प्रश्नावरून विद्यार्थ्यांचा आक्रोश; कुलगुरूंविरोधात घोषणाबाजी
पुणे विद्यापीठात कॅरी ऑन प्रश्नावरून पुन्हा विद्यार्थ्यांचा आक्रोश उसळला. शेकडो विद्यार्थी विद्यापीठात धडकले असून, कुलगुरूंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. दीड महिना उलटूनही निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांत नाराजी.
सायली मेमाणे
पुणे १४ ऑगस्ट २०२५ : पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कॅरी ऑन प्रश्नावरून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा आक्रोश उसळला आहे. आज सकाळपासून शेकडो विद्यार्थी विद्यापीठ परिसरात जमले असून, कुलगुरूंविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आहेत. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, त्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी निगडित महत्त्वाच्या मागणीवर विद्यापीठ प्रशासनाने गेल्या दीड महिन्यापासून कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
कॅरी ऑनसंदर्भात विद्यार्थ्यांनी मागणी सादर केल्यापासून ८ जुलैपासूनच आंदोलन सुरू आहे. मात्र, याला आता दीड महिना उलटूनही प्रशासनाने निर्णय घेण्यासाठी वेळ काढलेला नाही. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, दोन वेळा मोठे आंदोलन झाल्यानंतरही प्रशासनाने केवळ आश्वासने दिली, पण प्रत्यक्षात कोणतेही आदेश काढले नाहीत.
आज पुन्हा मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यापीठात धडकले आणि कुलगुरू कार्यालयासमोर घोषणाबाजी सुरू केली. “विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा”, “कॅरी ऑन द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनेक विद्यार्थी हातात फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, “विद्यापीठ प्रशासनाला आमचे वर्ष वाचवण्यासाठी वेळ नाही. आमच्या शैक्षणिक वर्षाची आणि करिअरची हानी होत असतानाही दुर्लक्ष केले जात आहे.”
विद्यार्थ्यांच्या वाढत्या आक्रोशामुळे विद्यापीठ प्रशासनावर दबाव वाढला आहे. काही विद्यार्थी संघटनांनीही या प्रश्नात उडी घेतली असून, पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, परिस्थिती हाताळण्यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, जर प्रशासनाने तत्काळ निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र होईल, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
कॅरी ऑन धोरणाबाबतचा हा वाद केवळ पुणे विद्यापीठापुरता मर्यादित न राहता, राज्यातील इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचे लक्ष वेधत आहे. त्यामुळे या प्रश्नावर येणारा निर्णय हा अनेक विद्यार्थ्यांसाठी निर्णायक ठरणार आहे.