पुण्यात चोरीच्या दुचाकींसह दोघे जेरबंद, गुन्हे शाखा युनिट ६ ची यशस्वी कारवाई
पुण्यात चोरीच्या दुचाकींसह दोघे जेरबंद, गुन्हे शाखा युनिट ६ ची यशस्वी कारवाई
पुण्यात गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने चोरीच्या दोन दुचाकींसह दोन आरोपींना अटक केली. लोणीकंद आणि वाघोली परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली. पोलिसांचा कौतुकास्पद तपास.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे ११ जुलै २०२५ : पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने वाहन चोरीचे दोन गुन्हे उघड करत चोरीच्या दुचाकींसह दोघांना अटक केली आहे. ही कामगिरी गुन्हे प्रतिबंध गस्त दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.
● पहिली कारवाई – लोणीकंद येथून चोरीची दुचाकी जप्त
दि. ०९ जुलै रोजी युनिट ६ चे सहा. पोलीस निरीक्षक राकेश कदम आणि त्यांचे पथक गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना पोलीस अंमलदार सचिन पवार यांना पेरणे फाटा, लोणीकंद येथे एक इसम चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.
यावरून सापळा रचून दीपक राजेंद्र बिडगर (वय २३, रा. शिरूर, पुणे) याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे असलेली स्प्लेंडर प्लस मोटारसायकल ही शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये चोरीची असल्याचे (गु. र. नं. ६२०/२०१९) स्पष्ट झाले.
● दुसरी कारवाई – वाघोलीतून दुचाकी चोराला अटक
दुसऱ्या कारवाईत, गुन्हे प्रतिबंध गस्त दरम्यान भावडी रोड, वाघोली येथे मच्छिंद्र दिगंबर खैरनार (वय ४१, रा. रांजणगाव, पुणे) याला एक होंडा शाइन दुचाकीसह संशयितपणे अटकाव करण्यात आला. चौकशीत ती दुचाकी म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेली असल्याचे (गु. र. नं. ३५७/२०२३) निष्पन्न झाले.
दोन्ही आरोपींसह चोरीच्या दुचाकींचे हस्तांतरण संबंधित पोलीस ठाण्यांकडे करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (आर्थिक व सायबर) विवेक मासाळ, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पो. नि. राकेश कदम, सपोनि मदन कांबळे व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.