पोलिसी बंदोबस्तातही मनसेचा ‘मराठी मोर्चा’ चर्चेत; व्यापाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करत सादर केला माफीनामा

0
पोलिसी बंदोबस्तातही मनसेचा 'मराठी मोर्चा' चर्चेत

पोलिसी बंदोबस्तातही मनसेचा 'मराठी मोर्चा' चर्चेत

मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसाच्या सन्मानासाठी मनसेचा मोर्चा; व्यापाऱ्यांचा माफीनामा, पोलिसांकडून मनसे नेत्यांना अटक

सायली मेमाणे

मुंबई ८ जुलै २०२५ : मुंबई – मराठी अस्मिता आणि भाषेच्या सन्मानासाठी मीरा-भाईंदर परिसरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नेतृत्वाखाली मराठी मोर्चा काढण्यात येणार होता. गेल्या काही महिन्यांपासून मराठी माणसावर अन्याय होत असल्याचा आरोप करत, या मोर्चात अनेक मराठी संघटना आणि राजकीय पदाधिकारी सहभागी होणार होते. सकाळी १० वाजता नियोजित असलेल्या मोर्च्याला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. मात्र मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे वातावरण चिघळले आणि मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न करत पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत अनेक नेत्यांना अटक केली.

मनसेचे नेते संदीप देशपांडे, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. अविनाश जाधव यांना पहाटे तीनच्या सुमारासच ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना काशिमिरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, संदीप देशपांडे व माजी आमदार राजू पाटील यांना देखील मीरा-भाईंदरमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांना अधिकृत नोटीस देत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई केल्याचे सांगितले.

या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा घटनाक्रम समोर आला आहे. मीरा-भाईंदरमधील काही व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे माफीनामा सादर करत दिलगिरी व्यक्त केली आहे. “आमच्या कृतीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो,” असे स्पष्ट करत त्यांनी मराठी माणसाच्या सोबत असल्याचे पत्राद्वारे म्हटले आहे. “आमच्या मोर्चामुळे चुकीचा राजकीय संदेश गेला असल्यास आम्ही खेद व्यक्त करतो,” असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले. तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि समाजात तिढा निर्माण होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांकडून हा माफीनामा देण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

मनसेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्च्याच्या निमित्ताने मराठी समाजात असंतोष उफाळून आला आहे. अनेक मराठी नागरिकांनी, स्थानिक नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी विविध स्तरांवर मराठी भाषेला आणि मराठी व्यक्तींना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचे निदर्शनास आणले आहे. घर भाड्याने न देणे, मराठी पाट्या हटवणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी मराठी न वापरण्याच्या घटनांमुळे अस्वस्थता वाढली होती. या पार्श्वभूमीवर आजचा मोर्चा केवळ एक शक्तीप्रदर्शन नव्हे, तर मराठी अस्मितेचा आवाज होता.

पोलीस बंदोबस्तातही मराठी माणूस रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. जमावबंदीचा आदेश लागू असतानाही मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर दिसले, यावरून असंतोषाची तीव्रता स्पष्ट झाली. मनसे कार्यकर्त्यांनी “परवानगी नसलातरी आम्ही मोर्चा काढणारच,” अशी भूमिका घेतल्यामुळे पोलिसांची धावपळ झाली होती.

या घडामोडींमुळे मुंबईसह ठाणे-पालघर परिसरात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. व्यापाऱ्यांचा माफीनामा, पोलिसांची अटकसत्र, आणि मराठी समाजातील असंतोष – या सर्व घडामोडी पुढील राजकीय दिशा ठरवतील, असे जाणकारांचे मत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed