प्रेमाच्या नावाखाली वकिलाकडून लैंगिक शोषण; छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक प्रकार
प्रेमाच्या नावाखाली वकिलाकडून लैंगिक शोषण; छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरात २७ वर्षीय महिलेला प्रेमाच्या आमिषाने फसवून एका वकिलाने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघड झाला. दोनदा गर्भपात, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप.
पुणे ६ ऑगस्ट २०२५ :छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे एका तरुण महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून वारंवार लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप एका वकिलावर करण्यात आला आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित २७ वर्षीय महिलेस आरोपी वकिलाशी सोशल मीडियावरून ओळख झाली.
सुरुवातीला साधी मैत्री सुरू झाली आणि काही काळात ती प्रेमसंबंधात बदलली. मात्र, हा प्रेमसंबंध महिलेसाठी मानसिक, शारीरिक आणि भावनिक त्रासदायक ठरला. आरोपीने महिलेला वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले आणि नकार दिल्यास मारहाण केली.
इतकेच नाही तर या शोषणातून पीडितेचा दोन वेळा गर्भपात करावा लागल्याची माहितीही समोर आली आहे. जेव्हा महिलेनं लग्नाचा विषय काढला, तेव्हा आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि गाडीखाली चिरडून टाकण्याचंही म्हणाला. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या महिलेनं अखेर पोलिसांकडे धाव घेतली असून आरोपीविरोधात लैंगिक शोषण, मारहाण, धमकी आणि जबरदस्तीचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू केली आहे. वकिलासारख्या कायद्याच्या रक्षकाकडून असा गुन्हा घडणं ही समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असून या प्रकारामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.