महाराष्ट्रातील शहरांमध्ये धूलिकणांचा कहर; वायू गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर

0
महाराष्ट्रातील शहरांमध्ये धूलिकणांचा कहर; वायू गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर

महाराष्ट्रातील शहरांमध्ये धूलिकणांचा कहर; वायू गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर

महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये धूलिकणांची पातळी राष्ट्रीय मानकांपेक्षा जास्त आढळली. मुंबई आणि एमएमआर परिसरात वायू गुणवत्ता धोक्याच्या स्तरावर पोहोचली असल्याचे संयुक्त अहवालातून स्पष्ट झाले आहे.

सायली मेमाणे

१३ नोव्हेंबर २०२५ : महाराष्ट्रातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये वायू गुणवत्तेची स्थिती गंभीर बनली आहे. राज्यातील धूलिकणांची म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) पातळी राष्ट्रीय मानकांपेक्षा जास्त असल्याचे ‘वातावरण फाऊंडेशन’ आणि ‘एन्वारोकॅटलिस्ट’ यांच्या संयुक्त अहवालातून उघड झाले आहे. विशेषतः मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सतत खालावत असल्याचे दिसत आहे. धूलिकणांच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.

राज्यातील नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, अमरावती यांसारख्या शहरांमध्ये पीएम 2.5 आणि पीएम 10 या दोन्ही स्तरांमध्ये मोठी वाढ नोंदली गेली आहे. पीएम 2.5 हा अतिसूक्ष्म धूलिकण असून तो थेट फुफ्फुसांमध्ये जाऊन श्वसनतंत्रावर मोठा परिणाम करतो. त्यामुळे दम्यासारखे आजार, श्वसनाचे त्रास, हृदयविकार आणि डोळ्यांच्या समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक वाढते. महाराष्ट्रातील हवेतील पीएम पातळी ही जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांपेक्षा अनेकपटीने अधिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई आणि एमएमआर परिसराची स्थिती सर्वात चिंताजनक मानली गेली आहे. वाढती वाहतूक, कन्स्ट्रक्शन साइटवरील धूळ, औद्योगिक प्रदूषण, कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन आणि हिवाळ्यातील स्थिर हवामान यामुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण अचानक वाढले आहे. हवेत धुक्यासारखी धूळ पसरलेली दिसत असून दृश्यता कमी झाली आहे. सकाळ-संध्याकाळच्या वेळेत नागरिकांना डोळ्यांची जळजळ, छातीत जडपणा आणि श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि औद्योगिकदृष्ट्या विकसित असलेल्या महाराष्ट्रात प्रदूषण हे नवीन समस्येचे रूप धारण करत आहे. कन्स्ट्रक्शन साइटवर धूळ निघण्यापासून ते वाहनांच्या धुरापर्यंत अनेक कारणांनी प्रदूषण वाढत आहे. विशेषतः शहरांमध्ये वाढलेल्या लोकसंख्येमुळे वाहनांचा ताण वाढला आहे आणि त्यामुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. काही शहरांमध्ये तापमान घटल्याने प्रदूषक जमिनीच्या जवळ अडकून राहत आहेत आणि त्यामुळे हवा आणखी प्रदूषित होत आहे.

अहवालात सरकार आणि स्थानिक प्रशासनाला तातडीने उपाययोजना राबविण्याची सूचना दिली आहे. त्यात बांधकामस्थळी धूळ नियंत्रणासाठी यंत्रणा बसवणे, रस्त्यांची नियमित धुलाई, वाहतूक नियंत्रण आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये प्रदूषणाची तपासणी वाढवणे यांचा समावेश आहे. नागरिकांनीसुद्धा मास्कचा वापर, वाहनांचा कमीतकमी वापर आणि प्रदूषण कमी करणाऱ्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वायू प्रदूषण हा फक्त पर्यावरणाचा नाही तर आरोग्याचा मोठा प्रश्न बनत चालला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि हृदयविकार व दमा असलेल्या व्यक्तींना याचा सर्वाधिक धोका आहे. महाराष्ट्रात वाढलेल्या धूलिकणांच्या प्रमाणामुळे आगामी काळात आरोग्यविषयक संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार, स्थानिक संस्था आणि नागरिकांनी मिळून प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने कठोर पावले उचलणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *