मिरा भाईंदरमध्ये मराठीचा एल्गार! व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देताना ठाकरे पुन्हा रणांगणात
मिरा भाईंदरमध्ये मराठीचा एल्गार! व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देताना ठाकरे पुन्हा रणांगणात
मिरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरे 18 जुलै रोजी मराठीचा एल्गार पुकारणार; सभा, रॅलीची तयारी.
सायली मेमाणे
पुणे १० जुलै २०२५ : मुंबईच्या उपनगरात असलेल्या मिरा-भाईंदर शहरात सध्या मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष उफाळून आला आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी ‘मराठी शिकणार नाही’ म्हणत घेतलेल्या मोर्चाला प्रशासनाने दिलेली अनुमती आणि त्यानंतर मराठी मोर्चाला मिळालेल्या विरोधामुळे वातावरण अधिकच तापले. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 18 जुलै रोजी मिरा रोड येथे जाऊन मोठ्या सभेद्वारे मराठीचा जयघोष करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सभा केवळ भाषणापुरती मर्यादित न राहता, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी अस्मिता पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न ठरणार आहे.
मिरा भाईंदरमध्ये अमराठी लोकांची संख्या लक्षणीय असून, मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या विरोधात खुलेपणाने भाष्य करणाऱ्या घटकांची उपस्थिती देखील जाणवते. व्यापाऱ्यांनी उघडपणे मराठी शिकण्यास नकार दिला, आणि मराठी बोलल्यामुळे झालेल्या मारहाणीच्या घटनेतील आरोपींना अटक करण्याची मागणी करत प्रशासनाकडे मोर्चा काढला. धक्कादायक बाब म्हणजे, या मोर्चाला प्रशासनाकडून अनुमती देण्यात आली, तर मराठी माणसाच्या हक्कासाठी निघालेल्या मोर्चाला सुरुवातीस परवानगी नाकारण्यात आली.
या परिस्थितीवरून संतप्त झालेल्या मनसेने आपल्या नेतृत्वाखाली मराठी मोर्चा पुकारला. पोलिसांनी काही काळ मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला, काही नेत्यांची धरपकड केली, पण अखेरीस जनभावनेच्या रेट्यापुढे पोलीस प्रशासनाने झुकत परवानगी दिली. यानंतर राज ठाकरे स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेत असून, 18 जुलै रोजी मिरा रोडमध्ये सभा घेऊन सर्व घटनांवर भाष्य करतील.
याआधी 5 जुलै रोजी वरळीतील कार्यक्रमात राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मराठीसाठी सगळे वाद बाजूला ठेवूया’ असा निर्धार व्यक्त केला होता. त्यानंतर मिरा भाईंदर प्रकरण घडल्यामुळे, आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी मतांचे एकत्रिकरण करण्याची रणनीती आता उघडपणे दिसत आहे.
राज ठाकरे यांची सभा फक्त राजकीय घोषणांची नसून ती मराठी अस्मितेच्या पुनरुज्जीवनाचा एल्गार ठरणार आहे. त्यांच्या ‘ठाकरी’ भाषणशैलीतून पोलिस प्रशासन, राज्य सरकार आणि अमराठी घटकांना जोरदार प्रत्युत्तर मिळेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक लावतात.
या मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात “मराठीचा मुद्दा” केंद्रस्थानी येणार हे निश्चित असून, मिरा भाईंदरमधील सभा म्हणजे मराठी माणसाच्या आत्मसन्मानाचा आवाज ठरणार आहे.